पॅरिस : आशियातील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर, भारताची अग्रगण्य पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मोठी मजल मारण्याच्या उद्देशाने उतरणार आहेत. या स्पर्धेतील सलामी लढतीत बहुतांशी भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर तगडे आव्हान असणार आहे.
जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या या जोडीने हाँगकाँग आणि चायना मास्टर्समध्ये अंतिम फेरी गाठली होती, तर गेल्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत ते आपल्या मोहिमेची सुरुवात इंडोनेशियाच्या मुहम्मद रियान अर्दियांतो आणि रहमत हिदायत या जोडीविरुद्ध करतील.
इतर खेळाडूंमध्ये, हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या लक्ष्य सेनला पुरुष एकेरीत पुन्हा एकदा आयर्लंडच्या न्हाट गुयेनचा सामना करावा लागेल, तर यूएस ओपनचा विजेता युवा खेळाडू आयुष शेट्टीसमोर जपानच्या कोकी वातानाबेचे कडवे आव्हान असेल. लक्ष्यने गेल्या आठवड्यात डेन्मार्कमध्ये या आयरिश खेळाडूला तीन गेम्समध्ये पराभूत केले होते.
महिला एकेरीत, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आिŠर्टक ओपन सुपर 500 स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचून लक्षवेधी कामगिरी करणारी उदयोन्मुख तारका अनमोल खरब हिला पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या आन से-यंग या तगड्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. अनुपमा उपाध्यायला चौथ्या मानांकित चीनच्या हान युईविरुद्ध, तर जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर पुनरागमन करणारी उन्नती हुडा मलेशियाच्या करुपथेवन लेत्साना विरुद्ध खेळेल.
पुरुष दुहेरीच्या ड्रॉमध्ये पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक के. यांचाही समावेश आहे, तर महिला दुहेरीत पहिल्याच फेरीत दोन भारतीय जोड्यांमध्ये सामना होईल. यात कविप्रिया सेल्वम-सिमरन सिंग जोडीचा सामना पांडा भगिनी-ऋतुपर्णा आणि श्वेतापर्णा यांच्याशी होईल.