बार्बाडोस : वेस्टइंडीजचे माजी अष्टपैलू खेळाडू बर्नार्ड जूलियन यांचे त्रिनिदाद येथील वालसेन या शहरात वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जूलियन हे १९७५ मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कॅरेबियन संघाचे २४ कसोटी आणि १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी गोलंदाजीद्वारे ६८ बळी घेतले, तर फलंदाजीने ९५२ धावांचे योगदान दिले. ते डावखुरे मध्यमगती गोलंदाज आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जात होते.
जूलियन यांनी १९७५ च्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी २० धावा देऊन ४ बळी घेतले, तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भेदक मारा करून २७ धावांमध्ये ४ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ३७ चेंडूंमध्ये २६ धावांची उपयुक्त खेळी साकारली होती.
वेस्टइंडीजचे माजी महान कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, जूलियन हे नेहमीच आपले शंभर टक्के योगदान देत असत. ते फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये विश्वासार्ह खेळाडू होते. त्यांनी प्रत्येक सामन्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. ते खरोखरच एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. जूलियन यांची कसोटी कारकीर्दही अविस्मरणीय ठरली. १९७३ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध त्यांनी १२१ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली होती, तर त्याच्या पुढच्याच वर्षी त्याच संघाविरुद्ध त्यांनी ५ बळी घेण्याची किमया साधली होती.’
लॉयड यांनी पुढे सांगितले की, ‘आम्ही सर्व जूलियन यांचा खूप आदर करत होतो. त्यांचा स्वभाव विनोदी आणि मनमिळाऊ होता. लॉर्ड्सवरील ऐतिहासिक विजयानंतर आम्ही दीर्घकाळ चाहत्यांसाठी स्वाक्षऱ्या देत होतो. जूलियन यांना सर्वत्र मान आणि सन्मान मिळत होता.’