मुंबई : भिवंडीतील आकृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय पथकाने मंगळवारी जाहीर केले. यादरम्यान, विनोद कांबळीने आपल्या चाहत्यांसाठी भावनिक प्रतिक्रिया दिली. ‘कल खेल में, हम हो ना हो’, जीना यहाँ, मरना यहॉँ’ या आपल्या काही आवडत्या गाण्याच्या ओळीही त्याने निर्धारपूर्वक म्हणून दाखवल्या. तसेच आपण लवकरच घरी परतू, अशी आशा व्यक्त केली.
विनोद कांबळीवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. क्रीडा व राजकीय वर्तुळातून अनेक मान्यवर रुग्णालयात भेटी देत आहेत. दरम्यान, विनोद कांबळीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून लवकरच विनोदला आयसीयूमधून जनरल वॉर्डच्या खोलीत हलवले जाणार असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी दिली आहे. या रुग्णालयातर्फे आजन्म मोफत उपचार केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीवर उपाय म्हणून व्यापक प्रमाणावर आर्थिक मदतीचे आवाहन केले जात आहे. याला मिळालेल्या प्रतिसादातून जवळपास 30 लाख रुपये जमा करण्यात येऊन ते कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
क्रिकेटपटू विनोद कांबळी याची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यास वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून, येणार्या काळात त्यांना आणखी मदत करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले. राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळीने कृतज्ञता व्यक्त केली तसेच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली.