foreign players playing in psl fear they will never go back to pakistan
दुबई : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले झाले. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही बसला. इंडियन प्रीमियर लीग 2025 (आयपीएल) एका आठवड्यासाठी स्थगित झाली, तर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) देखील स्थगित झाली. पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्याचाही विचार होता. मात्र, त्यांना यासाठी नकार मिळाला. अखेर ही स्पर्धाही स्थगित करण्यात आली. यावेळी परदेशी खेळाडू घाबरलेले दिसले. काहींनी कधीही परत पाकिस्तानात येणार नसल्याचे सांगितले.
स्पर्धा रद्द झाल्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणारे परदेशी खेळाडूही त्वरित मायदेशी रवाना झाले; पण यावेळी त्यांच्या मनात भीतीने थैमान घातले होते. याबाबत बांगला देशचा लेग स्पिनर रिशाद हुसैनने खुलासा केला आहे. थेट विमान नसल्याने खेळाडू आधी दुबईला आले आणि मग तिथून आपापल्या देशांत परतले.
हुसैन ‘पीएसएल’मध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळतो. त्याने दुबईला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘संकटावर मात करत आम्ही दुबईला पोहोचलो, त्यामुळे आता बरे वाटत आहे. दुबईत पोहोचल्यानंतर आम्हाला असे समजले की, आम्ही उड्डाण केल्यानंतर 20 मिनिटांनी विमानतळावर क्षेपणास्त्र कोसळले. ही बातमी भीतीदायक आणि दु:खद होती; पण आता इथे पोहोचल्यानंतर दिलासा मिळाला आहे.’
त्याने खेळाडू घाबरल्याचेही सांगितले, पेशावर झालमीचा बांगला देशी खेळाडू नाहिद राणाही घाबरल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘नाहिद खूप शांत आहे, कदाचित तणावामुळे असेल, असे मला वाटते. मी त्याला सांगत राहिलो की खूप तणाव घेऊ नकोस, आपल्याला काही होणार नाही. सुदैवाने आम्ही सुरक्षित दुबईला पोहोचलो.’
हुसैनने पुढे सांगितले की, ‘परदेशी खेळाडू, जसे की सॅम बिलिंग्स, डॅरिल मिचेल, कुशल परेरा, डेव्हिड वीज, टॉम करन सर्वच खूप घाबरले होते. दुबईला पोहोचताना मिचेल म्हणाला, मी परत कधीही पाकिस्तानला जाणार नाही. विशेषत:, अशा परिस्थितीत. एकूणच ते सर्व घाबरले होते.’
‘टॉम करन विमानतळावर गेला, तेव्हा त्याने विमानतळ बंद असल्याचे ऐकले. त्यानंतर तो लहान मुलाप्रमाणे रडायला लागला. त्याला सांभाळण्यासाठी दोन-तीन लोक लागली.’