स्पोर्ट्स

Football Player Killed : फुटबॉल जगतावर शोककळा; बसवर सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला, युवा खेळाडूचा मृत्यू

Tragic Football Incident : सशस्त्र दरोडेखोरांनी रस्ता अडवून बसवर हल्ला केला. चेहऱ्यावर मुखवटे घातलेल्या या हल्लेखोरांकडे बंदुका आणि अत्याधुनिक रायफल्स होत्या.

रणजित गायकवाड

अक्रा (घाना) : घाना प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या 'बेरेकम चेल्सी' या नामांकित फुटबॉल क्लबच्या बसवर झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात २० वर्षीय युवा खेळाडू डॉमिनिक फ्रिम्पॉन्ग याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी (दि. १२) एका सामना खेळून परतत असताना ही थरारक घडना घडली. घाना फुटबॉल असोसिएशनने (GFA) या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या घटनेमुळे संपूर्ण आफ्रिकन फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बेरेकम चेल्सीचा संघ समरेबोई येथील सामरटेक्स विरुद्धचा सामना खेळून दक्षिणेकडून आपल्या मूळ शहराकडे परतत होता. गोआसो-बिबियानी मार्गावर दबा धरून बसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या एका टोळीने रस्ता रोखून फुटबॉल संघाची बस अडवण्याचा प्रयत्न केला.

क्लबने सोमवारी (दि. १३) जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, ‘आमचा संघ समरेबोईहून बेरेकमकडे जात असताना सशस्त्र दरोडेखोरांनी रस्ता अडवून बसवर हल्ला केला. चेहऱ्यावर मुखवटे घातलेल्या या हल्लेखोरांकडे बंदुका आणि अत्याधुनिक रायफल्स होत्या. चालकाने बस सुरक्षितरीत्या मागे घेण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी बसच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जीव वाचवण्यासाठी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी बसमधून उतरून जवळच्या झुडपांचा आश्रया घेतला.’

एका उगवत्या ताऱ्याचा अंत

या गोळीबारात डॉमिनिक फ्रिम्पॉन्ग याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. घाना फुटबॉल असोसिएशनने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘डॉमिनिक फ्रिम्पॉन्गच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. हा केवळ बेरेकम चेल्सी क्लबचाच नव्हे, तर संपूर्ण घाना फुटबॉलचा मोठा तोटा आहे. डॉमिनिक हा एक आश्वासक तरुण खेळाडू होता, ज्याची खेळाप्रती असलेली जिद्द आणि निष्ठा आमच्या लीगची खरी ओळख होती.’

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घानामध्ये फुटबॉल संघांच्या बसवर हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये देखील लेगॉन सिटीजच्या बसवर सामरटेक्स येथील सामन्यानंतर असाच हल्ला झाला होता, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, फ्रिम्पॉन्गच्या मृत्यूनंतर आता खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्पर्धांसाठी प्रवास करणाऱ्या क्लब्सच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात येईल, असे आश्वासन फुटबॉल असोसिएशनने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT