पुढारी ऑनलाईन डेस्क : Joe Root Records : जो रूटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रूटने पहिल्या डावात 143 आणि दुसऱ्या डावात 103 धावा केल्या.
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सलग दोन्ही डावांत शतके झळकावली. या शतकांसह त्याचा खास क्लबमध्ये समावेश झाला आहे. 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर या ऐतिहासिक मैदानावर कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी चाहत्यांना पहायला मिळाल्या.
1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच 147 वर्षांत जो रूट हा इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत रूटने पहिल्या डावात 33वे कसोटी शतक तर दुसऱ्या डावात 34वे कसोटी शतक झळकावले. 34व्या शतकासह त्याने देशबांधव ॲलिस्टर कुक (33 शतके) यांला मागे टाकले. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. जॉर्ज हॅडली (1939), गूच (1990) आणि वॉन (2004) यांच्या बरोबरीने लॉर्ड्सवरील कसोटीच्या दोन्ही डावात शतके करणारा रूट हा केवळ चौथा फलंदाज ठरला.
रूटने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सातवे कसोटी शतक नोंदवले. यासह त्याने जगातील या प्रतिष्ठित मैदानावर सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम प्रस्थापित केला. त्याने लॉर्ड्सवर प्रत्येकी सहा शतके झळकावणाऱ्या ग्रॅहम गूच आणि मायकेल वॉनला मागे टाकले.
2020 पर्यंत जो रूटची कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 17 शतके होती. मग पुढच्या चार वर्षांत त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकल. त्याने 2021 मध्ये सहा शतके तर 2022 मध्ये पाच शतके झळकावली. मात्र, 2023 मध्ये तो जास्त कसोटी सामने खेळू शकला नाही. ज्यामुळे त्याला त्या वर्षात दोनच शतके करता आली. पण 2024 मध्ये तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आणि या वर्षात त्याने आतापर्यंत 4 शतके झळकावण्यात यशस्वी झाला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा आहेत. तर जो रूटने केवळ 145 कसोटी सामन्यात 12377 धावा केल्या आहेत. रुट आता सचिनपेक्षा केवळ 3,544 धावांनी मागे आहे. त्याचा फॉर्म पाहता तो लवकरच सचिनचा हा विश्वविक्रम मोडू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.