रोम : जागतिक फुटबॉलमधील महाशक्ती मानल्या जाणाऱ्या इटलीच्या अधोगतीचा नवा नीचांक मंगळवारी पाहायला मिळाला. युरोपियन प्ले-ऑफच्या अंतिम सामन्यात ६६ व्या क्रमांकावरील बोजनिया आणि हर्झगोव्हिनाने चार वेळच्या विश्वविजेत्या इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ असे पराभूत केले. या धक्कादायक पराभवामुळे इटलीचा संघ सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही. बोजनिया संघाला २०१४ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यात यश आले आहे.
सामन्याची सुरुवात इटलीसाठी आश्वासक झाली होती. १५ व्या मिनिटाला मोईस कीनने गोल करून इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतराच्या तीन मिनिटे आधी अलेस्झांड्रो बास्टोनीला 'लाल कार्ड' दाखवून मैदाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे १० खेळाडूंसह खेळणारा इटलीचा संघ बॅकफुटवर ढकलला गेला. ज्याचा फायदा बोस्नियाने घेतला. ७९ व्या मिनिटाला हॅरिस ताबाकोविचने गोल करत बोस्नियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित आणि अतिरिक्त वेळेतही ही बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला.
शूटआऊटमध्ये इटलीचे नशीब पुन्हा एकदा फिरले. पीयो एस्पोसिटो आणि ब्रायन क्रिस्टांते या दोघांनी पेनल्टी गमावल्या. दुसरीकडे, बोस्नियाच्या खेळाडूंनी एकही चूक न करता अचूक गोल डागले. १८ वर्षीय केरीम अलाजबेगोविचने पुन्हा एकदा नियंत्रण राखण्याची क्षमता सिद्ध करत महत्त्वाचा गोल केला. ‘आम्ही शेवटपर्यंत झुंज दिली आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य झाले,’ अशा भावना अलाजबेगोविचने व्यक्त केल्या.
१९३४, १९३८, १९८२ आणि २००६ मध्ये विश्वविजेतेपद भूषवणारा इटलीचा संघ आता किमान १६ वर्षे या ऐतिहासिक स्पर्धेपासून दूर राहणार आहे. विशेष म्हणजे, २०१० आणि २०१४ मध्ये इटलीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. २००६ मध्ये फ्रान्सला हरवून जेतेपद मिळवल्यानंतर इटलीला विश्वचषकाच्या बाद फेरीत एकही सामना खेळता आलेला नाही.
बोजनिया आणि हर्झगोव्हिना संघाविरुद्धच्या पराभवामुळे इटलीच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. जर एखादा चाहता २०१४ मध्ये १२ वर्षांचा असेल, तर तो २०२६ पर्यंत एकदाही आपल्या देशाला वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहू शकणार नाहीय. आता त्या चाहत्याला थेट २०३० च्या वर्ल्ड कपपर्यंत इटली संघाच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, म्हणजेच चाहत्यांची एक संपूर्ण पिढी फिफा वर्ल्डकपमधी इटलीच्या सहभागाविना मोठी होताना दिसणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, इटलीकडे सध्या जागतिक दर्जाच्या 'फॉरवर्ड' खेळाडूंची कमतरता भासत आहे. २०२० चा युरो कप जिंकल्यानंतर इटलीचा आलेख सातत्याने खाली घसरला आहे. बास्तोनीसारख्या खेळाडूने महत्त्वाच्या सामन्यात दाखवलेला बेजबाबदारपणा आणि संधीचे सोने करण्यात आलेले अपयश यामुळे इटलीवर आज ही नामुष्की ओढवली आहे.
पराभवानंतर इटलीचे प्रशिक्षक गेनारो गॅटुसो म्हणाले, ‘काय चुकले हे सांगणे सोपे आहे, पण वस्तुस्थिती हीच आहे की आपण सलग तीन विश्वचषकांसाठी पात्र ठरू शकलेलो नाही. हा आमच्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे.’ इटलीचा बचावपटू लिओनार्डो स्पिनॅझोला याने भावूक होत सांगितले की, ‘ज्या मुलांनी इटलीला कधीच विश्वचषकात खेळताना पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी हे खूप क्लेशदायक आहे.’
केवळ इटलीच नाही, तर जगातील सर्वोत्तम स्ट्रायकरपैकी एक असलेला रॉबर्ट लेवांडोस्की आणि त्याचा पोलंड संघही वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. स्वीडनने पोलंडवर मात करत आपले स्थान निश्चित केले आहे. या पराभवानंतर मैदानात लेवांडोस्कीचे अश्रू चाहत्यांना चटका लावून गेले. दुसरीकडे, ग्रॅहम पॉटर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीडनने आपली 'फेअरी टेल' यशस्वी केली आहे.