स्पोर्ट्स

FIFA World Cup : पेनल्टी शूटआऊटचा थरारक इतिहास! अर्जेंटिना ‘किंग’, स्पेनचा ‘नकोसा’ विक्रम; ८व्या पेनल्टीचा ‘शाप’ काय?

मेस्सी-मॉड्रिचचा शंभर टक्के रेकॉर्ड, तर 'हा' तगडा देश ठरला सर्वात फ्लॉप; वाचा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटची Inside Story

रणजित गायकवाड

फिफा विश्वचषकात बरोबरी सोडवण्यासाठी १९७८ च्या स्पर्धेपूर्वी 'पेनल्टी शूटआऊट'ची पद्धत लागू करण्यात आली. तेव्हापासून आजवर अनेक चुरशीचे सामने पेनल्टी शूटआऊटच्या जोरावर निकाली निघाले आहेत. फुटबॉल जगतात सर्वात जास्त थरारक आणि तितकाच दबाव आणणारा हा प्रकार मानला जातो. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, या महाकुंभातील पेनल्टी शूटआऊटच्या रंजक इतिहासाचा आणि आकडेवारीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

विश्वचषकाच्या इतिहासातील ३५ शूटआऊट्सचा लेखाजोखा

विश्वचषकाच्या प्रदीर्घ इतिहासात आतापर्यंत एकूण ३५ वेळा पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला आहे. फुटबॉल विश्वचषकातील पहिले पेनल्टी शूटआऊट ८ जून १९८२ रोजी खेळवले गेले. या सामन्यात पश्चिम जर्मनीने फ्रान्सचा ५-४ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. निर्धारित वेळेत हा सामना ३-३ असा बरोबरीत सुटला होता.

  • २०२२ चा विक्रम : कतार विश्वचषकात सर्वाधिक ५ सामने पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचले, जो विश्वचषक इतिहासातील एक विक्रम आहे.

  • अंतिम सामन्याचा थरार : कतार विश्वचषकातील फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील सामन्यासह इतिहासात केवळ ३ वेळा अंतिम सामना हा पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आहे (यापूर्वी १९९४ आणि २००६).

  • अपवाद : १९७८ मध्ये ही पद्धत सुरू होऊनही त्या स्पर्धेत एकही सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला नाही.

  • अर्जेंटिना अव्वल : विश्वचषकात सर्वाधिक ७ वेळा शूटआऊट खेळण्याचा विक्रम अर्जेंटिनाच्या नावावर आहे, ज्यातील ६ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे.

सर्वात 'हिट' आणि सर्वात 'फ्लॉप' देश

१००% रेकॉर्ड असणारे संघ : विश्वचषकात जर्मनी आणि क्रोएशिया हे दोन असे संघ आहेत ज्यांचा सामना करणे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला आवडणार नाही. या दोन्ही देशांनी खेळलेले आपले सर्वच्या सर्व चारही पेनल्टी शूटआऊट जिंकले आहेत.

सर्वात खराब कामगिरी (स्पेन) : स्पेनने ५ वेळा शूटआऊटचा सामना केला असून त्यांना केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. विश्वचषकात सर्वाधिक ४ शूटआऊट गमावण्याचा नकोसा विक्रम स्पेनच्या नावावर आहे. २०२२ मध्ये मोरोक्कोविरुद्ध स्पेनला एकही पेनल्टी गोल करता आला नाही.

विश्वचषकातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान पेनल्टी शूटआऊट

सर्वात मोठे शूटआऊट (सर्वाधिक १२ पेनल्टी) : विश्वचषकाच्या इतिहासात केवळ दोनच सामन्यांत सर्वाधिक १२ पेनल्टी मारल्या गेल्या आहेत.

  • १९८२ - पश्चिम जर्मनी वि. फ्रान्स

  • १९९४ - स्वीडन वि. रोमानिया (स्वीडन ५-४ ने विजयी)

वेळेनुसार सर्वात मोठे शूटआऊट : जून १९९० मधील आयर्लंड विरुद्ध रोमानिया हा सामना वेळेच्या बाबतीत सर्वात मोठा ठरला. ९ मिनिटे १२ सेकंदांच्या थरारानंतर आयर्लंडने यात विजय मिळवला होता.

सर्वात लहान शूटआऊट (अवघ्या ७ पेनल्टी) : इतिहासात केवळ ७ पेनल्टी मारून संपलेले तीनच सामने नोंदवले गेले आहेत.

  • १९८६ - पश्चिम जर्मनी वि. मेक्सिको (जर्मनीने केवळ ४ पेनल्टी घेतल्या).

  • २००६ - युक्रेन वि. स्वित्झर्लंड (स्वित्झर्लंडला एकही गोल करता आला नाही).

  • २०२२ - मोरोक्को वि. स्पेन (स्पेनला एकही गोल करता आला नाही).

'गोल्डन' गोलरक्षक

एकाच सामन्यात ३ गोल रोखणारे : पोर्तुगालचा रिकार्डो (२००६ विरुद्ध इंग्लंड), क्रोएशियाचा डॅनिजेल सुबासिच (२०१८ विरुद्ध डेन्मार्क) आणि क्रोएशियाचाच डोमिनिक लिवाकोविच (२०२२ विरुद्ध जपान) यांनी एकाच शूटआऊटमध्ये ३-३ गोल रोखण्याचा पराक्रम केला.

शून्य गोल स्वीकारणारे : संपूर्ण शूटआऊटमध्ये एकही गोल न स्विकारण्याचा पराक्रम युक्रेनच्या ओलेक्सांद्र शोव्कोव्स्की (२००६) आणि मोरोक्कोच्या यासिन बोनो (२०२२) यांनी केला आहे.

३ शूटआऊट खेळणारे दिग्गज : रॉबेर्टो बॅगिओ (इटली), लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) आणि लुका मॉड्रिच (क्रोएशिया) या केवळ तीनच खेळाडूंनी प्रत्येकी ३ पेनल्टी शूटआऊटमध्ये भाग घेतला आहे.

८ व्या नंबरची पेनल्टी सर्वात धोकादायक

पेनल्टी शूटआऊटमधील आकडेवारीचे विश्लेषण केल्यास खेळाडूंवरील मानसिक दबावाचे अनेक पैलू समोर येतात.

८ व्या पेनल्टीचा शाप : अचानक उद्भवणाऱ्या 'सडन डेथ'चा टप्पा सोडल्यास, शूटआऊटमधील ८ व्या क्रमांकाची पेनल्टी चुकण्याची शक्यता सर्वाधिक असते. या क्रमांकावर केवळ ५९.४% (३२ पैकी १९) गोल झाले आहेत.

सुरुवातीचा सक्सेस रेट : पहिल्या तीन पेनल्टीजचा सक्सेस रेट ७१% पेक्षा जास्त असतो, कारण सुरुवातीला संघातील मुख्य खेळाडू येतात. ४ थ्या आणि ५ व्या पेनल्टी वेळी हा दर ६४% पर्यंत घसरतो.

सामान्य वेळ विरुद्ध शूटआऊट : सामान्य वेळेत मिळणाऱ्या पेनल्टीचा गोल होण्याचा दर ७९.१% असतो, तर पेनल्टी शूटआऊटमध्ये हा दर ६९.४% वर येतो.

गोलपोस्टचा 'तो' कोपरा आणि टॉसचा कौल

१००% यशाची खात्री कुठे? : ऐतिहासिक आकडेवारीनुसार गोलपोस्टच्या वरच्या भागात मारलेले शॉट सर्वात यशस्वी ठरले आहेत. इतिहासात इथे मारलेले सर्व ३९ शॉट्स गोलमध्ये रूपांतरित झाले असून, गोलरक्षकाला एकही शॉट रोखता आलेला नाही. मात्र, यात चेंडू बाहेर जाण्याचा धोका सर्वाधिक असतो.

टॉस आणि पहिली पेनल्टी : विश्वचषकातील ३५ पैकी १७ सामने पहिल्यांदा पेनल्टी मारणाऱ्या संघाने, तर १८ सामने दुसऱ्यांदा पेनल्टी मारणाऱ्या संघाने जिंकले आहेत. म्हणजेच नाणेफेक जिंकून कोणताही मोठा फायदा मिळत नाही, इतिहास ५०-५० टक्के असाच राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT