स्पोर्ट्स

FIFA World Cup Lamine Yamal : यमाल परिधान करणार 19 क्रमांकाची जर्सी, मेस्सीच्या ‌‘त्या‌’ ऐतिहासिक पदार्पणाची पुनरावृत्ती

संघामधील प्रतिष्ठेची 10 क्रमांकाची जर्सी स्पेनने अन्य एका दिग्गज खेळाडूसाठी राखीव ठेवली आहे.

रणजित गायकवाड

माद्रिद : स्पेनचा उदयोन्मुख फुटबॉलपटू लॅमिन यमाल यंदाच्या फिफा विश्वचषक पदार्पणात 19 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीनेही आपल्या पहिल्या विश्वचषकात याच क्रमांकाची जर्सी परिधान केली होती, त्यामुळे यमालच्या या निर्णयाने मेस्सीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. दरम्यान, संघामधील प्रतिष्ठेची 10 क्रमांकाची जर्सी स्पेनने अन्य एका दिग्गज खेळाडूसाठी राखीव ठेवली आहे.

यमाल आणि ‌‘19‌’ क्रमांकाचे समीकरण

18 वर्षीय लॅमिन यमालने बार्सिलोना क्लबकडून खेळताना आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला याच 19 क्रमांकाच्या जर्सीसह फुटबॉल जगतात आपली ओळख निर्माण केली होती. सप्टेंबर 2023 मध्ये पदार्पण केल्यापासून यमालने याच क्रमांकाला पसंती दिली आहे. स्पेनला ‌‘युरो 2024‌’ चे जेतेपद मिळवून देण्यात आणि ‌‘युएफा‌’ लीगमध्ये उपविजेतेपद मिळवून देण्यात यमालने याच 19 क्रमांकाच्या जर्सीसह मोलाची भूमिका बजावली होती.

दानी ओल्मोकडे ‌‘10‌’ क्रमांकाची जर्सी

स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फुएन्ते यांनी नुकताच 26 सदस्यीय विश्वचषक संघाची घोषणा केली आहे. स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने जाहीर केलेल्या अधिकृत जर्सी क्रमांकांनुसार, बार्सिलोनामध्ये यमालकडे असलेला 10 क्रमांकाचा शर्ट आता स्पेनच्या संघात दानी ओल्मोकडे सोपवण्यात आला आहे. ओल्मो 2024 पासून या क्रमांकाची जर्सी वापरत आहे. यापूर्वी 2022 च्या कतार विश्वचषकात 10 क्रमांकाची जर्सी मार्को असेंसिओकडे होती. मात्र, त्याला यंदा संघात स्थान मिळालेले नाही.

स्पेनचा ‌‘क‌’ गटात समावेश

यंदाच्या विश्वचषकात स्पेनचा संघ ग्रुप ‌‘क‌’ मध्ये असून, त्यांच्यासोबत केप व्हर्डे, सौदी अरेबिया आणि उरुग्वे हे संघ आहेत. स्पेन आपल्या मोहिमेची सुरुवात 15 जून रोजी अटलांटा येथे केप व्हर्डेविरुद्ध करणार आहे.

लॅमिन यमाल

  • जन्म : 13 जुलै 2007

  • संघ : स्पेन आणि एफसी बार्सिलोना

  • आंतरराष्ट्रीय पदार्पण : 8 सप्टेंबर 2023 विरुद्ध जॉर्जिया (वय 16 वर्षे)

  • मॅच पोझिशन : राईट विंगर

  • विशेष कौशल्ये : व्हिजन, ड्रिबलिंग, मुव्हमेंट, नेतृत्वगुण, कल्पकता आणि पासिंग व फिनिशिंगमधील अचूकता.

यमाल विश्वचषकात का ठरू शकतो ‌‘सेंसेशन‌’

फिफा विश्वचषकात जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून दाखल होत असलेला हा विंगर, आपल्या दर्जेदार खेळ, कल्पकता आणि निर्णायक क्षमतेच्या जोरावर लुईस डी ला फुएन्ते यांच्या संघाला पुढे नेण्यासाठी आशादायी आहे. त्याने ‌‘द बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्डस्‌‍ 2025‌’ मध्ये दुसरे स्थान पटकावले असून, वयाशी संबंधित जवळपास सर्वच विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. त्याने वयाच्या अवघ्या 15 वर्षे, 9 महिने आणि 16 दिवस असताना बार्सिलोनाकडून पदार्पण केले. तो स्पेनसाठी खेळणारा आणि गोल करणारा आजवरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

नवीन पिढीतील खेळाडूंपैकी जर मला एकाची निवड करायची असेल, तर तो लॅमिन असेल. कारण, त्याने या वयात जे काही करून दाखवले आहे आणि जे भविष्य त्याच्यासमोर आहे, ते पाहता तो निश्चितच महान खेळाडू बनेल.
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिनाचा कर्णधार आणि बार्सिलोनाचा माजी फॉरवर्ड खेळाडू)
यमाल फुटबॉलच्या इतिहासातील महान प्रतिभावंतांमध्ये सहज दाखल होऊ शकतो. 15 व्या किंवा 16 व्या वर्षी तो व्यावसायिक फुटबॉलपटूंना चकवून ड्रिबलिंग आणि अप्रतिम खेळ हे फक्त त्याच्याशिवाय, नेमार, मेस्सी किंवा त्या स्तरावरील खेळाडूंकडूनच पाहायला मिळू शकतात.
- झावी हर्नांडेझ (यमालला पदार्पणाची संधी देणारे बार्सिलोनाचे माजी प्रशिक्षक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT