FIFA World Cup 2026 file photo
स्पोर्ट्स

FIFA World Cup: झोपही नाही आणि लाईव्ह मॅचही! फिफाच्या पहिल्याच दिवशी झी-५ चा बट्याबोळ; तांत्रिक बिघाडामुळे भारतीय चाहते संतप्त

FIFA World Cup 2026 live streaming india: बहुप्रतीक्षित फिफा विश्वचषक २०२६ चा थरार मध्यरात्री सुरू झाला खरा, मात्र भारतीय फुटबॉल चाहत्यांच्या उत्साहावर पहिल्याच दिवशी विरजण पडले.

मोहन कारंडे

FIFA World Cup 2026 live streaming india

मुंबई: बहुप्रतीक्षित फिफा विश्वचषक २०२६ चा थरार मध्यरात्री सुरू झाला खरा, मात्र भारतीय फुटबॉल चाहत्यांच्या उत्साहावर पहिल्याच दिवशी विरजण पडले. स्पर्धेचे अधिकृत डिजिटल प्रक्षेपक 'झी-५' च्या तांत्रिक बिघाडामुळे आणि सबस्क्रिप्शनच्या गोंधळामुळे चाहत्यांना मनस्ताप सहन करावा लागला. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या सामन्यादरम्यान लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सातत्याने येणाऱ्या अडचणींमुळे संतप्त चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सामना सुरू होण्याच्या काही दिवस आधीच या वादाची ठिणगी पडली होती. झी-५ ने जाहीर केलेल्या ७९९ रुपयांच्या 'फिफा वर्ल्ड कप पॅकेज'मध्ये सुरुवातीला तीन स्क्रीनवर एकाच वेळी सामना पाहण्याची सुविधा दिली होती. मात्र, ऐन सामन्याच्या तोंडावर ही मर्यादा एकाच स्क्रीनवर आणल्याचे युजर्सच्या निदर्शनास आले. यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्यानंतर कंपनीने घाईघाईने पुन्हा तीन स्क्रीनची सुविधा पूर्ववत केली.

४K स्ट्रीमिंग गायब; बफरिंग आणि ॲप क्रॅशमुळे युजर्स वैतागले

ऐतिहासिक 'इस्टाडिओ अझ्टेका' स्टेडियमवर जेव्हा मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू झाला, तेव्हा खरा गोंधळ समोर आला. झी-५ ने जाहिरातींमध्ये '४K क्वालिटी'मध्ये सामना दाखवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात चाहत्यांना साध्या एचडी क्वालिटीसाठीही झगडावे लागले. अनेक युजर्सनी आपल्या तक्रारी सोशल मीडियावर सांगितल्या आहेत. यामध्ये सामना सुरू असताना वारंवार व्हिडिओ फ्रीज आणि बफरिंग होणे, लॉग-इन आणि अकाऊंट ॲक्सेस न मिळणे, सामना सुरू होण्याच्या अचूक वेळीच सर्व्हर डाऊन होणे यासह केवळ फिफा वर्ल्ड कपसाठी ७९९ रुपये मोजावे लागल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

८ वर्षांचा करार

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने फिफासोबत पुढील ८ वर्षांसाठी एक करार केला आहे. यानुसार २०३४ पर्यंत फिफाच्या एकूण ३९ मोठ्या स्पर्धांचे भारतात exclusive प्रक्षेपण करण्याचे हक्क झी समूहाकडे आहेत. मात्र, या मोठ्या कराराच्या पहिल्याच दिवशी झी-५ ची तांत्रिक यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळाले.

तांत्रिक अडचणी कशा सोडवायच्या? 'झी-५' कडून मार्गदर्शक सूचना

सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर झी-५ ने युजर्ससाठी काही तात्पुरते उपाय सुचवले आहेत.

स्मार्ट टीव्ही आणि स्ट्रीमिंग स्टिक्ससाठी: टीव्हीच्या मुख्य ॲप्लिकेशन सेटिंग्समध्ये जाऊन 'Zee5' ॲप निवडा आणि तिथला 'Clear Cache and Data' हा पर्याय निवडा. समस्या सुटली नाही, तर ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा डाउनलोड करा.

वेब ब्राउझरसाठी (लॅपटॉप/कॉम्प्युटर): गुगल क्रोम, सफारी किंवा मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरची हिस्टरी आणि कुकीज 'All Time' साठी क्लिअर करा. तसेच, ॲड-ब्लॉकर किंवा कस्टम DNS बंद ठेवा.

स्क्रीन मर्यादेचा प्रश्न सोडवण्यासाठी: ज्यांना अद्यापही एकाच स्क्रीनची मर्यादा दाखवत आहे, त्यांनी सर्व डिव्हाइसेसमधून लॉग-आऊट करून पुन्हा नव्याने लॉग-इन करावे. सिस्टीम अपडेट झाल्यामुळे नवीन सेशनमध्ये तीन स्क्रीनची सुविधा सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT