व्हँकुव्हर : फिफा विश्वचषक २०२६ मधील 'ब' गटातील एका सामन्यात यजमान कॅनडाने आशियाई चॅम्पियन कतारचा ६-० असा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला. मात्र, व्हँकुव्हर येथील 'बीसी प्लेस' मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्याच्या अंतिम शिट्टीनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये तीव्र वाद होऊन मैदानावरच हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. मैदानातील चुरस आणि खेळाडूंचा आक्रमकपणा मर्यादा ओलांडून थेट हाणामारीवर उतरल्याचे पाहायला मिळाले.
सामन्याच्या ५४ व्या मिनिटाला कतारच्या असीम मादिबोने मागून केलेल्या एका धोकादायक टॅकलमुळे कॅनडाचा २४ वर्षीय मिडफिल्डर इस्माईल कोने गंभीर जखमी झाला. या धडकेचा आवाज थेट सीमारेषेपर्यंत ऐकू आला, असे प्रशिक्षक मार्श यांनी सांगितले. कोने याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने कॅनडाच्या गोटात आनंदाचे वातावरण चिंतेत बदलले.
कोनेला तातडीने स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर फाऊलसाठी मादिबोला सुरुवातीला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते, परंतु रेफ्रींनी व्हीएआर (VAR)मध्ये ही घटना तपासून पिवळ्याचे रूपांतर लाल कार्डमध्ये केले. यामुळे मादिबोला मैदानाबाहेर जावे लागले. कतारचा हा या सामन्यातील दुसरे लाल कार्ड ठरले. कारण यापूर्वी पहिल्या सत्रात होमाम अल अमीनलाही मैदानाबाहेर काढण्यात आले होते. परिणामी कतारला ९ खेळाडूंसह खेळावे लागले.
सामना संपल्याची अंतिम शिट्टी वाजताच दोन्ही संघांचे खेळाडू आणि साहाय्यक कर्मचारी एकमेकांवर धावून गेले. मैदानावर झालेल्या या राड्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. कॅनडाचे प्रशिक्षक जेसी मार्श आणि कतारचे प्रशिक्षक ज्युलेन लोपेटेगुई यांच्यातही मैदानाबाहेरील या वर्तनावरून शाब्दिक चकमक झाली. मार्श यांनी कतारच्या राखीव खेळाडूंच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘एका स्पष्ट फाऊलमुळे आमच्या खेळाडूचा पाय तुटला असताना, कतारचे राखीव खेळाडू रेड कार्डच्या निर्णयाविरोधात भांडायला येत होते, हे विचित्र वर्तन आहे.’
या वादाव्यतिरिक्त हा सामना कॅनडासाठी ऐतिहासिक ठरला. कॅनडाने फिफा विश्वचषक इतिहासातील आपला पहिलावहिला विजय अत्यंत दिमाखात साजरा केला. कॅनडाचा स्टार स्ट्रायकर जोनाथन डेव्हिडने शानदार हॅटट्रिक नोंदवत अनेक विक्रम मोडीत काढले. युरोप आणि दक्षिण अमेरिकेबाहेरील देशांमधून विश्वचषकात हॅटट्रिक करणारा तो इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी १९३० मध्ये अमेरिकेच्या बर्ट पाटेनॉडेने हा पराक्रम केला होता. चालू विश्वचषकात हॅटट्रिक नोंदवून डेव्हिडने अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. डेव्हिडने २९ व्या, ४५+३ व्या आणि ९०+२ व्या मिनिटाला गोल केले. त्या आधी सायल लारिनने १६ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवला होता.
या सामन्यात कॅनडाने आक्रमणाचा धडाका लावला होता. १९६६ पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, कॅनडाने कतारच्या पेनल्टी बॉक्समध्ये तब्बल ९७ वेळा चेंडूला स्पर्श केला, जो विश्वचषक इतिहासातील एक नवा विक्रम आहे. तसेच, पहिल्या सत्रात कॅनडाने गोलच्या दिशेने ८ अचूक फटके मारले. यापूर्वी १९९४ मध्ये रोमानियाने अर्जेंटिनाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. याशिवाय, १९७८ मधील अर्जेंटिनाच्या पेरूवरील ६-० च्या विजयानंतर विश्वचषकातील एका सामन्यात ६ गोल करणारा कॅनडा हा पहिला यजमान देश ठरला आहे.
दुसरीकडे, ९ खेळाडूंसह खेळणाऱ्या कतारसाठी हा सामना अत्यंत निराशाजनक ठरला. 'ऑप्टाजोस'च्या (OptaJose) आकडेवारीनुसार, फिफा विश्वचषकाच्या एकाच सामन्यात दोन लाल कार्ड मिळवणारा कतार हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. तसेच, १९६६ नंतर सामन्याच्या पहिल्या तासाभरातच दोन खेळाडू मैदानाबाहेर जाण्याची ही इतिहासातील केवळ तिसरी वेळ आहे.
या विजयासह कॅनडा दोन सामन्यांत ४ गुणांसह 'ब' गटात अव्वल स्थानावर पोहोचला असून बाद फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुढील सामन्यात कॅनडाचा सामना स्वित्झर्लंडशी होईल, तर तळाला असलेला कतार संघ सिएटल येथे बोस्निया-हर्झगोव्हिनाशी भिडणार आहे.