नवी दिल्ली; वृत्तसंस्था : फिफाच्या 2026 मध्ये होणार्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तिकीट विक्रीला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्या चोवीस तासात 210 देशांमधील तब्बल 15 लाखांहून अधिक तिकिटांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. फुटबॉलची जागतिक नियामक संस्था असणार्या फिफाने ही माहिती एका निवेदनाद्वारे शुक्रवारी जाहीर केली.
तिकिटांसाठीच्या मागणीमध्ये सर्वाधिक अर्ज अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या यजमान देशांमधून आले आहेत. त्यानंतर अर्जेंटिना, कोलंबिया, ब्राझील, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि जर्मनीमधूनही मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
ही विश्वचषक स्पर्धा मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिका या तीन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 32 ऐवजी 48 संघ सहभागी होतील. एकूण 104 सामने 16 यजमान शहरांमध्ये खेळवले जातील. ‘प्रीसेल ड्रॉ’ 19 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. तिकीट अर्ज दाखल करण्याची वेळ चाहत्यांच्या संधीवर परिणाम करणार नाही. तिकिटांची सुरुवातीची किंमत 60 डॉलर (जवळपास 5,000 रुपये) आहे. मागणीनुसार दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.