झुरिच (स्वित्झर्लंड) : आगामी फिफा विश्वचषक 2026 साठी जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. 11 डिसेंबर 2025 ते 13 जानेवारी 2026 या काळात चाललेल्या रँडम सिलेक्शन ड्रॉ तिकीट विक्रीच्या टप्प्यात जगभरातून 50 कोटींहून अधिक तिकीट अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती फिफाने दिली आहे. या विक्रमी मागणीमुळे फिफा विश्वचषक 2026 हा क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिकीट विक्रीसाठी अर्ज मागणीच्या 33 दिवसांच्या या कालावधीत दररोज सरासरी 1.5 कोटी (15 दशलक्ष) अर्जांची नोंद झाली. फिफाच्या 211 सदस्य देशांमधील सर्वच प्रदेशांतून चाहत्यांनी अर्ज केले आहेत. प्रथमच या स्पर्धेत 48 संघ सहभागी होणार आहेत.
यजमान देश (अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा) वगळता जर्मनी, इंग्लंड, ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेंटिना आणि कोलंबिया या देशांमधून सर्वाधिक अर्ज आले आहेत.
चाहत्यांमध्ये सर्वाधिक आकर्षण असलेल्या पाच सामन्यांची यादी अशी:
कोलंबिया विरुद्ध पोर्तुगाल (27 जून, मियामी) - या टप्प्यातील सर्वात जास्त मागणी असलेला सामना.
मेक्सिको विरुद्ध दक्षिण कोरिया (18 जून, ग्वाडालाजारा).
विश्वचषक फायनल (19 जुलै, न्यूयॉर्क न्यू जर्सी).
स्पर्धेचा उद्घाटन सामना : मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका (11 जून, मेक्सिको सिटी).
राऊंड-ऑफ-32 सामना (2 जुलै, टोरँटो).
तिकीट अर्जांचा निकाल चाहत्यांना 5 फेब्रुवारी 2026 पासून ई-मेलद्वारे कळवला जाईल. मागणी उपलब्ध तिकिटांपेक्षा जास्त असल्याने, रँडम सिलेक्शन (लॉटरी पद्धत) द्वारे पारदर्शकपणे तिकिटांचे वाटप केले जाईल. ज्यांचे अर्ज यशस्वी होतील, त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तिकिटाचे पैसे आपोआप कापले जातील. ज्यांना या टप्प्यात तिकीट मिळणार नाही, त्यांना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी लास्ट मिनीट सेलमध्ये तिकीट खरेदीची पुन्हा संधी मिळेल.
हा सेल आधी येईल त्यास प्राधान्य या तत्त्वावर असेल. फिफाने चाहत्यांना अधिकृत वेबसाईटवरूनच तिकिटे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय चाहत्यांनी लवकरात लवकर व्हिसासाठी अर्ज करावा, असेही सुचवले आहे.
तिकीट मागणीसाठी 50 कोटी अर्जांचा आकडा ही केवळ मागणी नसून, तो फुटबॉलचा जागतिक प्रभाव दर्शवणारा संदेश आहे.जियानी इन्फँटिनो, फिफा अध्यक्ष