तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नॉर्वेचा फुटबॉल संघ 'फिफा विश्वचषक २०२६' च्या रणांगणात रणशिंग फुंकण्यासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. १९९८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या मुख्य फेरीत धडक मारणाऱ्या नॉर्वेने केवळ मैदानातील रणनीतीवरच नाही, तर खेळाडूंच्या ऊर्जेचा स्रोत असलेल्या आहारावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
मँचेस्टर सिटीचा स्टार गोलमशीन एर्लिंग हालँड आणि आर्सेनलचा कल्पक कर्णधार मार्टिन ओडेगार्ड यांसारख्या दिग्गज शिलेदारांना मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करता यावी, यासाठी नॉर्वेने एक अनोखी आणि भव्य तयारी केली आहे. घरच्या मैदानापासून हजारो मैल दूर असतानाही खेळाडूंना मातृभूमीतील अन्नाची चव आणि ताकद मिळावी, म्हणून नॉर्वेमधून थेट अमेरिकेत तब्बल १,००० किलोपेक्षा जास्त पारंपरिक खाद्यपदार्थांचा साठा विमानाने पाठवण्यात आला आहे.
या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत नॉर्वेच्या संघाने आपल्या ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तिथे तळावर ३०० किलो पारंपरिक नॉर्वेजियन मासे, ११६ किलो तेथील प्रसिद्ध 'ब्रूनोस्ट' (ब्राउन चीज) आणि तब्बल ६,००० रसाळ संत्री आणली आहेत. वरवर पाहता ही केवळ खाद्यपदार्थांची जंत्री वाटू शकते, पण विश्वचषकासारख्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नॉर्वेच्या गोटातून समोर आलेली ही अत्यंत रंजक आणि दूरगामी रणनीती मानली जात आहे.
हा संपूर्ण खटाटोप केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा खेळाडूंच्या सोयीसाठी केलेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये प्रवासाचा थकवा, हवामानातील बदल, हॉटेलमधील वास्तव्य आणि सरावाचे बदलणारे वेळापत्रक यांमुळे खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक संतुलनावर परिणाम होत असतो. फुटबॉलचा थरार सुरू होण्यापूर्वीच खेळाडूंच्या दिनक्रमात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी हा मास्टरप्लॅन आखण्यात आला आहे. आपल्या घरच्या आहाराच्या बळावर खेळाडू अनपेक्षित वातावरणातही लवकर एकरूप होऊ शकतात, हा यामागील शुद्ध वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे.
या विशेष मोहिमेची धुरा सांभाळण्यासाठी नॉर्वेचे शेफ अॅरॉन एस्पेलँड यांच्यासह तीन आघाडीचे स्कँडिनेव्हियन आचारी संघात सामील झाले आहेत. खेळाडूंना दिवसातून चार वेळा ताजा आणि पौष्टिक आहार देण्यासाठी सज्ज असलेल्या शेफ अॅरॉन यांनी सांगितले की, सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट दर्जाच्या नॉर्वेजियन घटकांचा वापर करून अन्न तयार करणे आणि ऐन कसोटीच्या वेळी ते खेळाडूंना वाढणे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
अर्थात, अर्धा टन मासे आणि अन्नसाठा विमानाने अमेरिकेत आणणे हे अजिबात सोपे काम नव्हते, परंतु खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून ७ जून रोजी नॉर्वेचा न्यू जर्सी येथे मोरोक्कोविरुद्ध सराव सामना संपन्न झाला. त्यानंतर नॉर्वेचा संघ नॉर्थ कॅरोलिना येथे पोहोचला.
नॉर्वेचा संघ यंदा केवळ एक सहभाग म्हणून या स्पर्धेकडे पाहत नाही, तर ते विजेतेपदाचे तगडे दावेदार म्हणून मैदानात उतरत आहेत. त्यांची विश्वचषकापर्यंतची वाटचाल अत्यंत देदीप्यमान आणि प्रतिस्पर्ध्यांचा थरकाप उडवणारी ठरली आहे. पात्रता फेरीतील सर्वच्या सर्व आठ सामने जिंकत त्यांनी तब्बल ३७ गोल डागले, ज्यात एकट्या एर्लिंग हालँडने १६ गोलचा डोंगर उभा केला. या विस्मयकारक आकडेवारीमुळेच नॉर्वेच्या या 'फूड मिशन'कडे एक वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. खेळाला अंतिम स्वरूप देताना प्रत्येक लहान-सहान गोष्टीचा किती बारकाईने विचार केला जातो, याचेच हे उत्तम उदाहरण आहे.
क्रीडा स्पर्धांमध्ये अशा प्रकारे अन्नसाठा घेऊन जाण्याचा नॉर्वेचा हा पहिलाच प्रयोग नाही. यापूर्वी २०१८ च्या प्योंगचांग हिवाळी ऑलिम्पिक दरम्यान नॉर्वेजियन क्रीडा महासंघाने चक्क १५,००० अंडी मागवून जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, ऑलिम्पिकमधील त्या गमतीदार अनुभवातून धडा घेत, यंदाच्या फुटबॉल विश्वचषकासाठी अत्यंत नियंत्रित आणि अचूक नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या स्पर्धेत नॉर्वेचा सामना फ्रान्स, सेनेगल आणि इराक अशा बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या 'ग्रुप ऑफ डेथ' (Group of Death) म्हणजेच सर्वात कठीण गटात होणार आहे. अशा खडतर आव्हानांचा सामना करताना, नॉर्वेच्या खेळाडूंना त्यांचा हा पारंपरिक आहार मैदानात किती ऊर्जा देतो आणि हालँडची गोलची भूक कशी भागवतो, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.