येत्या काही दिवसांत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली फिफा (FIFA World Cup) विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. दरवेळेप्रमाणेच याही वेळी भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये फुटबॉलचा फिव्हर शिगेला पोहोचला आहे. मात्र, यंदाचा विश्वचषक भारतीय चाहत्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. ३९ दिवस चालणाऱ्या आणि १०४ सामन्यांच्या या इतिहासातील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ४८ संघांमध्ये भारतीय चाहत्यांना आपले 'स्वकीय' स्टार्स मैदानावर कौशल्य दाखवताना पाहता येणार आहेत.
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये तब्बल ४ भारतीय वंशाचे खेळाडू कतार, न्यूझीलंड, काँगो आणि ऑस्ट्रेलिया या वेगवेगळ्या देशांच्या संघांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. या भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्टही शेअर केली आहे.
फुटबॉलची प्रचंड क्रेझ असलेल्या केरळ राज्यातील १९ वर्षीय विंगर तहसीन जमशेदची कतारच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. या बातमीने केरळमधील फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी X पोस्ट करत म्हटलंय की, ‘भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे! २०२६ चा फिफा विश्वचषक जवळ येत असताना, भारतीय वंशाचे दोन खेळाडू जागतिक व्यासपीठावर आपल्या कौशल्याची छाप पाडणार आहेत.’
तहसीनबद्दल अधिक माहिती देताना थरूर यांनी नमूद केले की, ‘१९ वर्षीय विंगर तहसीन मोहम्मद जमशेदने कतारच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरून इतिहास रचला आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील आपल्या कौटुंबिक मुळांचा अभिमान तो जागतिक पातळीवर बाळगून आहे.’
तहसीनचा जन्म कन्नूर येथे झाला असून त्याचे आई-वडील मूळचे केरळचे आहेत. विशेष म्हणजे, तहसीनच्या वडिलांनी कतारच्या अंडर-१७ आणि अंडर-१९ संघांचे प्रतिनिधित्व केले होते, ज्याचा फायदा तहसीनला त्याचे फुटबॉल करिअर घडवण्यासाठी झाला.
ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा २५ वर्षीय विंगर-स्ट्राईकर निशाण वेलुपिल्लई हा देखील प्रतिभावान खेळाडू मानला जातो. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३ गोल केले आहेत. चीनविरुद्धच्या पात्रता फेरीत, सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला मैदानात उतरल्यानंतर अवघ्या ७ मिनिटांत गोल झळकावून त्याने ऑस्ट्रेलियाला ३-१ असा विजय मिळवून दिला होता. शशी थरूर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मेलबर्न व्हिक्ट्री क्लबचा २५ वर्षीय गतिमान विंगर निशाण वेलुपिल्लईचा ऑस्ट्रेलियाच्या २६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला असून त्याचे मूळ तामिळनाडूमध्ये आहे.’
तथापि, विकिपीडियावरील माहितीनुसार, निशाणचे वडील शशीनाथ वेलुपिल्लई हे मलेशियाचे रहिवासी असून त्यांचे श्रीलंका-तमिळ कनेक्शन आहे, तर त्याची आई गिलियन वेलुपिल्लई या अँग्लो-इंडियन आहेत. निशाणचे बालपण आणि फुटबॉलचे शिक्षण ऑस्ट्रेलियातच झाले आहे.
न्यूझीलंडच्या २७ वर्षीय अटॅकिंग मिडफिल्डर सरप्रीत सिंग याचे कुटुंब पंजाबमधील जालंधरचे असल्याचे सांगितले जाते. सरप्रीतचा जन्म न्यूझीलंडमध्येच झाला. गेल्या ८ वर्षांत त्याने न्यूझीलंडसाठी २४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३ गोल केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, तो जर्मनीतील 'बायर्न म्युनिक' (Bayern Munich) या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबसाठी देखील खेळला आहे.
फ्रान्समध्ये जन्मलेला २९ वर्षीय सॅम्युअल मुथुस्सामी हा डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळतो. सध्या तो 'ग्रीक सुपर लीग' मधील 'आर्टिमॉस' क्लबकडून आणि आफ्रिकन देश काँगोच्या राष्ट्रीय संघाकडून खेळत आहे. काँगोसाठी त्याने आतापर्यंत ५७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सॅम्युअलची आई काँगोची रहिवासी असून त्याचे वडील तामिळ वंशाचे आहेत.
चालू विश्वचषकातील या चार खेळाडूंच्या आधी भारतीय वंशाच्या विकास धोरासू याने भारतीय फुटबॉल चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली होती. धोरासू यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथून मॉरिशस आणि त्यानंतर फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते. धोरासू २००६ मध्ये जर्मनी येथे झालेल्या फिफा विश्वचषकात उपविजेत्या ठरलेल्या फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाचा महत्त्वाचा भाग होते.
भारताने १९५० मध्ये ब्राझील येथे झालेल्या विश्वचषकासाठी पात्रता फेरी पार केली होती. मात्र, काही तांत्रिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे भारतीय संघ त्या विश्वचषकात सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर भारताला कधीही फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरता आलेले नाही.
एकीकडे फुटबॉलच्या या सर्वात मोठ्या महाकुंभाचा आनंद भारतीय चाहते नक्कीच घेतील, परंतु दुसरीकडे मायदेशातील फुटबॉलची सद्यस्थिती क्रीडाप्रेमींना अस्वस्थ करणारी आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार संदेश झिंगन याच्यासह देशातील सुमारे १५० अव्वल फुटबॉलपटूंचे सध्या करारांचे नूतनीकरण झालेले नाही. भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि विविध व्यावसायिक क्लब यांच्यात सध्या आर्थिक हिस्सेदारीवरून वाद सुरू असल्यामुळे खेळाडूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. या प्रशासकीय अनागोंदीचा फटका भारतीय फुटबॉलला बसत असून, सध्या भारताचे फिफा क्रमवारीतील स्थान १३६ व्या क्रमांकावर घसरले आहे.