दोहा : रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलर व्हिनिसियस ज्युनिअर ‘फिफा’च्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. याचवेळी महिला गटात बार्सिलोनाची ऐताना अव्वल खेळाडू ठरली. 24 वर्षीय व्हिनिसियस यापूर्वी ऑक्टोबरमध्ये बॅलॉन ओडोर पुरस्कार हुकल्याने निराश झाला होता. मात्र, येथे व्हिनिसियसने पुरस्कारावर आपली मोहोर उमटवत ती कसर भरून काढली. योगायोग म्हणजे ऑक्टोबरमध्ये बॅलॉन ओडोर पुरस्कार जिंकणारा मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर रॉड्री येथे फिफा पुरस्काराच्या शर्यतीत व्हिनिसियसपेक्षा पाच गुणांनी मागे राहत दुसर्या स्थानी फेकला गेला.
24 वर्षीय ब्राझिलियन व्हिनिसियस फिफाचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माद्रिदतर्फे इंटरकाँटिनेंटल कप फायनल खेळल्यानंतर दोहाकडे रवाना झाला. फिफाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्हिनिसियस अतिशय भावुक होत म्हणाला, मला आज कुठून सुरुवात करावी, हे देखील उमजत नाही. गोनॅलोच्या रस्त्यावर अनवाणी पायाने खेळत मी सुरुवात केली; पण तेथून इथवर उत्तुंग झेप घेता येईल, हे माझ्या स्वप्नातही नव्हते. आता ज्या मुलांना आपल्याला काहीच शक्य नाही, असे वाटते, त्यांच्यासाठी मी अधिक वेळ देणार आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडू ठरण्यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले आहेत आणि या सर्व परिश्रमाचे, त्यागाचे आता खर्या अर्थाने सोने झाले आहे.
व्हिनिसियसला स्पेनमध्ये अनेकदा वंशभेदी टीकाटिपणीला सामोरे जावे लागले आणि एक वेळ तर खेळाला अलविदा करावा, असे टोकाचे विचार त्याच्या मनात येऊन गेले होते; पण नंतर त्याने संघर्ष सोडण्याऐवजी लढत राहण्याचा निर्धार केला आणि हीच जिद्द आता त्याला फिफाचा सर्वोत्तम पुरस्कार प्रदान करून गेली आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
दरम्यान, महिला गटात स्पेनची 26 वर्षीय बोन्मती ऐताना वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलर ठरली. या मिडफिल्डरने बॅलॉन ओडोर पुरस्कार सलग दोनवेळा जिंकला आहे, तर 2024 मध्ये बार्सिलोनाला स्पॅनिश लीग, स्पॅनिश कप व चॅम्पियन्स लीगही जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.