पणजी : तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा एकदा फिडे बुद्धिबळ वर्ल्डकपचे भारतात (गोव्यात) आयोजन होत आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न साकार झाले आहे. 2002 मध्ये हैदराबाद येथे वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विश्वनाथ आनंद याने वर्ल्डकप जिंकून संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी वर्ल्डकपचा लोगो आणि गीताचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. सावंत व क्रीडामंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते झाले. आयोजनामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळून आंतरराष्ट्रीय मैत्री संबंध मजबूत होतील. तसेच, स्थानिकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, बुद्धिबळ प्रत्येकाला शांतता, शिस्त आणि संयम शिकवतो. मागील काही वर्षांत गोव्याने बुद्धिबळात विशेष कामगिरी प्राप्त केली आहे. आज लाँच केलेल्या लोगोमधून गोव्याचे प्रतिबिंब आणि बुद्धिबळाची शिस्त दिसून येते. लोगो आणि गीतामुळे गोवा जागतिक वर्ल्डकपचे आयोजन करण्यास सज्ज असल्याचा संदेश जगाला देण्यात आला.
फिडे बुद्धिबळ वर्ल्डकप यावर्षी 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या काळात हडफडे बार्देश येथील रिसॉर्ट रिओ येथे होणार असून, 82 देशांतील 206 खेळाडू यात सहभागी होतील. ही स्पर्धा ‘नॉक-आऊट’ स्वरूपात खेळवली जाणार असून, विजेत्याला तब्बल 2 मिलियन डॉलरचे पारितोषिक मिळेल.
यंदाच्या स्पर्धेत विशेष आकर्षण ठरणार आहे, तो म्हणजे फॉस्टिनो ओरो. हा फक्त 12 वर्षांचा अर्जेंटिनाचा बुद्धिबळपटू आहे. जो फिडे चेस वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरणार आहे. तसेच, भारताची उदयोन्मुख खेळाडू दिव्या देशमुख हिला वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे संधी मिळाली असून, ती ‘ओपन सेक्शन’मध्ये खेळणार आहे.
स्पर्धेत जगातील नामवंत खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. गुकेश डी, अर्जुन एरिगैसी, प्रग्नानंदा आर., अनिश गिरी, वेस्ली सो, विन्सेंट केमर, हान्स नीमन, नोदीरबेक अब्दुसत्तोरोव, इयान नेपोम्नियाची, रिचर्ड रॅपोर्ट, विदित गुजराथी, निहाल सरीन आणि इतर अनेक दिग्गज खेळाडू यात सहभागी होणार आहेत.