Ferran Torres India connection FIFA World Cup 2026 Spain winner
नवी दिल्ली : स्पेनला दुसरे फिफा विश्वचषक विजेतेपद मिळवून देणारा नायक म्हणून २६ वर्षीय फेरान टोरेसचे नाव आता फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. अंतिम सामन्याच्या अतिरिक्त वेळेतील (१०६व्या मिनिटाला) त्याने डाव्या पायाने मारलेल्या दमदार फटक्याने चेंडू थेट जाळ्याच्या छताला जाऊन भिडला आणि स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
बार्सिलोनाकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या टोरेसच्या कारकिर्दीत आता क्लब आणि देशासाठीची दोन सर्वोच्च विजेतेपदे जमा झाली आहेत. मात्र, या विश्वविजेत्या नायकाचा भारताशी असलेला एक खास आणि फारसा चर्चेत नसलेला संबंध अनेकांना माहिती नाही.
विश्वचषक अंतिम फेरीतील ऐतिहासिक गोल करण्याच्या जवळपास नऊ वर्षांपूर्वी, अवघ्या १७ वर्षांचा असताना फेरान टोरेस भारतात आला होता. २०१७ मध्ये भारतात झालेल्या फिफा अंडर-१७ विश्वचषकात स्पेनच्या संघाचे प्रतिनिधित्व करत त्याने भारतीय फुटबॉलप्रेमींना आपल्या प्रतिभेची पहिली झलक दाखवली होती.
त्या वेळी तो व्हॅलेन्सिया क्लबच्या युवा अकादमीचा भाग होता. स्पेनच्या अत्यंत प्रतिभावान युवा संघातील तो प्रमुख खेळाडू मानला जात होता. राईट विंगवर खेळताना त्याने स्पेनला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेत त्याच्या नावावर दोन गोल आणि दोन असिस्टची नोंद झाली होती. अंतिम सामन्यात स्पेनला इंग्लंडकडून ५-२ असा पराभव स्वीकारावा लागला आणि संघ उपविजेता ठरला.
लिओनेल मेस्सीच्या डोळ्यांत अश्रू आणणारा विश्वचषक विजेता गोल करण्याच्या कितीतरी आधी, फेरानच्या अफाट प्रतिभेची पहिली साक्ष भारतामध्ये नोंदवली गेली होती. कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीरांगण येथे त्याच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
२०२६ मध्ये विश्वविजेता ठरलेल्या स्पेनच्या संघात फेरान टोरेसव्यतिरिक्त आणखी एक असा खेळाडू आहे, ज्याने भारतात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात अनुभवली होती. बार्सिलोनामधील फेरानचा सहकारी आणि स्पेनचा मध्यरक्षक एरिक गार्सियाही २०१७ च्या फिफा अंडर-१७ विश्वचषकासाठी भारतात आलेल्या स्पेनच्या संघात होता. विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने अर्जेंटिनाविरुद्ध २१ मिनिटे मैदानात खेळ केला.
फेरान टोरेसला क्लब फुटबॉलमध्ये सातत्याने गोल करण्यात अपयश आल्यामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, त्याची योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहण्याची क्षमता आणि सहकाऱ्यांसोबतचा समन्वय हा त्याचा सर्वात मोठा गुण मानला जातो. विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने हेच सिद्ध केले. अतिरिक्त वेळेतील १०६ व्या मिनिटाला निको विल्यम्सने हेडर द्वारे पास मिळाल्यानंतर क्षणार्धात फेरानने चेंडूवर झडप घातली आणि डाव्या पायाच्या अचूक हाफ-व्हॉलीने चेंडू गोल जाळ्यात धाडला.
या गोलाच्या जोरावर स्पेनने ऐतिहासिक विजय मिळवला आणि फेरान टोरेसला अंतिम सामन्यातील 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच स्पेनसाठी विश्वचषक विजेता गोल करणाऱ्या आंद्रेस इनिएस्तानंतरचा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला.
टोरेसचा भारताशी असलेला संबंध केवळ कोची आणि कोलकात्यापुरता मर्यादित नाही. त्याने आसाममधील गुवाहाटी येथेही खेळला आहे. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी सरुसजाई येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर झालेल्या फिफा अंडर-१७ विश्वचषकातील सामन्यात त्याने स्पेनच्या वतीने फ्रान्सविरुद्ध मैदानात उतरला होता. त्या सामन्यात स्पेनने २-१ असा विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा ठरली होती.
जवळपास नऊ वर्षांनंतर याच तरुणाने फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर इतिहास घडवला. २० जुलै रोजी न्यू जर्सीतील मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी झाला. नियोजित ९० मिनिटांनंतरही सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता.
अतिरिक्त वेळेत प्रशिक्षकांनी फेरान टोरेसला मैदानात उतरवले आणि त्याने संधीचे सोने केले. १०६ व्या मिनिटाला डाव्या पायाने जोरदार फटक्या मारत त्याने स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तोच गोल अखेर निर्णायक ठरला आणि स्पेनने दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.
या विश्वचषक मोहिमेत टोरेसला गोल करण्यासाठी अनेक संधी मिळाल्या होत्या. बहुतांश सामन्यांत तो राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरला, मात्र त्याला गोल करण्यात यश आले नव्हते. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात त्याचा एक गोल व्हीएआर तपासणीनंतर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, सर्वात महत्त्वाच्या क्षणी त्याने स्वतःला सिद्ध केले. फुटबॉलच्या सर्वोच्च मंचावर त्याने निर्णायक गोल करत स्पेनला विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि सर्व टीकाकारांना मैदानावरच उत्तर दिले.
२९ फेब्रुवारी २००० रोजी स्पेनमधील फोयोस येथे जन्मलेल्या फेरान टोरेस गार्सियाने व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात व्हॅलेन्सियाकडून केली. २०१७ मध्ये त्याने वरिष्ठ संघासाठी पदार्पण केले. २०२० मध्ये तो मँचेस्टर सिटीमध्ये दाखल झाला. तेथे त्याने प्रीमियर लीग आणि ईएफएल कप जिंकला. जानेवारी २०२२ मध्ये त्याने बार्सिलोनात प्रवेश केला.
सुरुवातीच्या काही हंगामांत त्याची कामगिरी संमिश्र राहिली. मात्र, त्याने पुन्हा दमदार पुनरागमन केले आणि बार्सिलोनाच्या यशात मोठा वाटा उचलला. २०२४-२५ हंगामात ला लिगा, कोपा डेल रे आणि सुपरकोपा दे एस्पान्या ही तिहेरी विजेतेपदे जिंकण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतरच्या हंगामात त्याने २१ गोल करत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि बार्सिलोनाला पुन्हा ला लिगा विजेतेपद मिळवून देण्यात हातभार लावला.
फेरान टोरेसने स्पेनच्या विविध युवा संघांमधून प्रगती करत २०२० मध्ये वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्याने यूईएफए युरो २०२०, २०२२ फिफा विश्वचषक आणि युरो २०२४ स्पर्धेत स्पेनचे प्रतिनिधित्व केले. युरो २०२४ मध्ये स्पेनने जेतेपद पटकावले होते.