मँचेस्टर; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड संघात सध्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी ही 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत तीन सामन्यांनंतर इंग्लंड 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे. मात्र चौथ्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. संघाचे दोन वेगवान गोलंदाज जखमी आहेत. अशात आता इंग्लंड दौर्यावर 24 वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघाने कव्हर म्हणून बोलावले आहे.
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला हरियाणाचा वेगवान गोलंदाज कंबोज भारतीय संघात आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी सामील झाला आहे. त्याला दुखापतग्रस्त अर्शदीप सिंगच्या जागेवर कव्हर म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. अर्शदीप सिंगला गुरुवारी सरावावेळी साई सुदर्शनने मारलेला चेंडू अडवताना डाव्या हाताला दुखापत झाली. त्याला चेंडूने कापल्याने टाके पडले आहेत. तो ज्या हाताने गोलंदाजी करतो, त्याच हाताला त्याला टाके पडल्याने तो किमान चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सूत्राने सांगितले आहे की, ‘अंशुल भारतीय संघात पुढील दोन सामन्यांसाठी एक पर्याय म्हणून सामील होण्यासाठी मँचेस्टरला रवाना झाला आहे.’ भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना मँचेस्टरला 23 जुलैपासून खेळायचा आहे.
दरम्यान, अर्शदीपने अद्याप कसोटीत पदार्पण केले नाही, पण तो चौथ्या कसोटीसाठी प्रबळ दावेदार होता. कारण लॉर्डस्ला झालेल्या तिसर्या कसोटीवेळी आकाशदीप यालाही मांडीच्या जवळ वेदना झाल्या होत्या, ज्यामुळे त्याला मैदानातून बाहेरही जावे लागले होते. तसेच त्याने भारतीय संघ मँचेस्टरला येण्यापूर्वी झालेल्या सराव सत्रातही सहभाग घेतला नव्हता. अशात त्याच्या चौथ्या सामन्यातील उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे.
अंशुलने 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 486 धावा केल्या आहेत, तर 79 विकेटस् घेतल्या आहेत. त्याने 25 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 40 विकेटस् घेतल्यात, तर 30 टी-20 सामन्यांमध्ये 34 विकेटस् घेतल्या आहेत.