इस्लामाबाद : ‘आयसीसी’ चॅम्पियन्स चषकाच्या साखळी सामन्यात रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. विराट कोहलीसह अन्य भारतीय खेळाडूंच्या अप्रतिम खेळीमुळे हा विजय साकारला; पण पाकिस्तानातील एका खासगी वृत्तवाहिनीवर पाकिस्तानच्या पराभवाची कारणमीमांसा करताना भारतीय संघावर भलताचा आरोप करण्यात आला. जादूटोणा केल्यामुळेच पाकिस्तानी संघाचा पराभव झाला, असा ‘जावई शोध’ या कार्यक्रमात चर्चा करणार्यांनी लावला. यासाठी ‘बीसीसीआय’ने स्टेडियममध्ये 22 पंडित आणून बसवले होते, असाही आरोप करण्यात आला.
यासंबंधीचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा खेळ खराब व्हावा, यासाठी प्रत्येक खेळाडूमागे दोन पंडित मंत्र-तंत्र करत होते, असेही चर्चेत सहभागी असलेल्या एका दीडशहाण्याने यावेळी सांगितले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन पंडित मैदानात येऊन बंधन करून जातात, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी टीव्हीच्या बॅकग्राऊंड स्क्रीनवर स्टेडियममध्ये बसलेल्या पंडितांचा फोटोही दाखवण्यात आला. अर्थात, हा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचे कोणाच्याही सहज लक्षात येईल. भारताचा हार्दिक पंड्या हा काळी जादू करण्यात मास्टर असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्याने चेंडूवर ‘ब्लॅक मॅजिक’ करून बाबर आझमला बाद केले, असेही त्यांचे म्हणणे आहे.
भारताचा संघ पाकिस्तानात खेेळायला येत नाही. कारण, पाक सरकार भारतीय संघासोबत त्या पंडितांना येऊ देणार नाही. त्यामुळे त्यांची काळी जादू पाकमध्ये चालू शकणार नाही, असे मुलाखतीत वेगळे कारणही सांगितले. तसेच याच कारणामुळे पाकिस्तानी संघाच्या खेळाची सुरुवात चांगली होते; पण ऐन मोक्याच्या क्षणी एखाद्या खराब बॉलवर पाकचे खेळाडू आऊट होतात, असे म्हटले असून याच कारणाने पाकिस्तानी संघ विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात पराभूत होतो, असेही म्हटले आहे.