स्पोर्ट्स

English Premier League : मँचेस्टर युनायटेडचा क्रिस्टल पॅलेसवर दमदार विजय, क्रिस्टलची 12 सामन्यांची अभेद्य मालिका संपुष्टात

युनायटेडचा डच स्ट्रायकर जोशुआ झिर्कझी याने तब्बल वर्षभरानंतर लीगमध्ये आपला पहिला गोल झळकावत फॉर्ममधील दुष्काळ संपवला.

रणजित गायकवाड

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने क्रिस्टल पॅलेसवर 2-1 असा विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. या विजयामुळे पॅलेसची मायदेशातील 12 सामन्यांची अभेद्य मालिका संपुष्टात आली.

युनायटेडचा डच स्ट्रायकर जोशुआ झिर्कझी याने तब्बल वर्षभरानंतर लीगमध्ये आपले पहिले गोल झळकावत फॉर्ममधील दुष्काळ संपवला. गेल्या वर्षी 1 डिसेंबरला एव्हर्टनविरुद्ध केलेल्या दोन गोलनंतर त्याला इंग्लंडच्या टॉप फ्लाईटमध्ये गोल करता आला नव्हता. परंतु, सेलहर्स्ट पार्क येथे त्याने केलेल्या शानदार गोलमुळे ही प्रतीक्षा संपुष्टात आली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात जीन-फिलिप मातेता याने पेनल्टीवर गोल करून पॅलेसला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, 54 व्या मिनिटाला झिर्कझीने आपल्या वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर केलेल्या गोलमुळे युनायटेडने सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर 63 व्या मिनिटाला मेसन माऊंटने बॉक्सच्या बाहेरून विजयी गोल डागून युनायटेडचा विजय निश्चित केला.

झिर्कझीच्या गोलने युनायटेडला प्रेरणा

जोशुआ झिर्कझीने जवळपास वर्षभरानंतर प्रीमियर लीगमध्ये गोल केला, तर मेसन माऊंटने विजयी गोल नोंदवला. या दोघांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून येत क्रिस्टल पॅलेसचा 2-1 असा पराभव केला. रुबेन आमोरिम यांच्या नेतृत्वाखालील युनायटेडचा संघ पहिल्या सत्रात मातेताच्या पेनल्टीमुळे पिछाडीवर होता. परंतु, मध्यंतरानंतर झिर्कझी आणि माऊंट यांनी गोल करत युनायटेडचा गेल्या चार सामन्यांतील पहिला विजय निश्चित केला.

डिसेंबर 2024 मध्ये एव्हर्टनविरुद्ध गोल केल्यापासून झिर्कझीने केलेल्या या पहिल्या गोलमुळे युनायटेडने खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन केले. 24 वर्षीय झिर्कझी एप्रिलपासून आपल्या मागील आठ सामन्यांमध्ये गोल करण्यात अपयशी ठरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT