लंडन : प्रीमियर लीग गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या अर्सेनलची आपली आघाडी अधिक मजबूत करण्याची सुवर्णसंधी शुक्रवारी हुकली. एमिरेटस् स्टेडियमवर रंगलेल्या चुरशीच्या लढतीत चौथ्या स्थानावरील लिव्हरपूलने अर्सेनलला गोलशून्य बरोबरीत रोखले.
या बरोबरीनंतरही अर्सेनल 49 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. मँचेस्टर सिटी आणि ॲस्टॉन व्हिला अनुक्रमे 43 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असून लिव्हरपूल 35 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तत्पूर्वी, मँचेस्टर सिटीने ब्राईटनसोबत बरोबरी पत्करल्यामुळे अर्सेनलला 8 गुणांची आघाडी घेण्याची संधी होती, मात्र विद्यमान विजेत्यांविरुद्ध त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले.
संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या स्पष्ट संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. लिव्हरपूलचा गोलरक्षक लिसन बेकरची अर्सेनलच्या स्ट्रायकर्सनी फारशी परीक्षा घेतली नाही. दुसरीकडे, दुखापतग्रस्त ह्युगो एकिटिकेच्या अनुपस्थितीत लिव्हरपूलची आक्रमक फळीही निस्तेज भासली. लिव्हरपूलच्या कॉनर ब्रॅडलीचा एक प्रयत्न गोलपोस्टच्या क्रॉसबारला धडकून परतला. नंतर त्यालाही गुडघ्याच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले.
या लढतीच्या दुसऱ्या सत्रात लिआंड्रो ट्रॉसार्डचा पास मार्टिन झुबिमेंडीने उत्कृष्टरीत्या अडवत अर्सेनलची चाल उधळून लावली. लिव्हरपूलच्या डॉमिनिक सोबोस्लाईचा फ्री-किकवरील प्रयत्नही गोलपोस्टच्या वरून गेल्याने सामन्यातील कोंडी कायम राहिली. गॅब्रिएल मार्टिनेलीने अखेरच्या मिनिटांत प्रयत्न केले, मात्र अर्सेनलला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या बरोबरीमुळे अर्सेनलची घरच्या मैदानावरील सलग सात विजयांची मालिका खंडित झाली आहे.
अर्सेनलचा पुढील सामना 17 जानेवारी रोजी नॉटिंगहॅम फॉरेस्ट विरुद्ध होणार आहे. त्याआधी गनर्स संघ एफए कपमध्ये पोर्टस्माऊथ आणि ईएफएल कपमध्ये चेल्सीशी भिडणार आहे.