IND vs ENG | इंग्लंडचा दणकेबाज मालिका विजय 
स्पोर्ट्स

IND vs ENG | इंग्लंडचा दणकेबाज मालिका विजय

तिसऱ्या वन-डेत भारत २७ धावांनी पराभूत; डकेट-बेथेलची १९२ धावांची विक्रमी भागीदारी

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्‍था : सलामीवीर बेन डकेटचे (१३५ चेंडूंत १८ चौकार, १ षटकारासह १४१) झंझावाती शतक आणि जेकब बेथेलच्या ९१ धावांच्या जोरावर इंग्लंडने रविवारी लॉर्डस्‌वर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वन-डे सामन्यात भारताचा २७ धावांनी धुव्वा उडविला. प्रारंभी, ५० षटकांत ३ बाद ३८७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतानेही जोरदार प्रतिकार केला. रोहित शर्माने ११० चेंडूंत १३८ धावा चोपल्या, तर शुभमन गिल व विराट कोहली यांनीही शानदार अर्धशतके झळकावली. तरीही भारताला २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यजमान इंग्लंडने यासह तीन सामन्यांची ही मालिका २-१ फरकाने जिंकली.

येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला डकेट आणि बेथेल जोडीने १९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. २२ वर्षांच्या बेथेलने ११ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या. त्यानंतर माजी कर्णधार जो रूट आणि जोस बटलर यांनी अखेरच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. इंग्लंडने शेवटच्या ५ षटकांत तब्बल ८२ धावा लुटल्या. रूटने ४८ चेंडूंत नाबाद ७४ धावा फटकावल्या. कर्णधार बटलरने अवघ्या १३ चेंडूंत नाबाद ४१ धावा कुटल्या. लॉर्डस्‌च्या ऐतिहासिक मैदानावर कोणत्याही संघाची ही सर्वोच्च वन-डे धावसंख्या ठरली आहे. रोहित व विराट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र ४०० सामने खेळण्याचा विक्रम येथे प्रस्‍थापित केला.

इंग्‍लंड : ५० षटकांत ३ बाद ३८७. (बेन डकेट १३५ चेंडूंत १८ चौकार, १ षटकारासह १४१, बेथेल ११ चौकार, २ षटकारांसह ९१. जो रूट ७४, बटलर १३ चेंडूंत ४ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ४१. प्रसिद्ध कृष्‍णा २/६९, प्रिन्‍स यादव १/७९)

भारत : ५० षटकांत ७ बाद ३६०. (रोहित शर्मा ११० चेंडूंत १७ चौकार, ५ षटकारांसह १३८, शुभमन गिल ८४ चेंडूंत ७७, विराट कोहली ६० चेंडूंत ७४. सॅम करन ४/७५, रशीद, बेथेल प्रत्येकी १ बळी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT