पुढारी ऑनलाईन डेस्क : English Batsman Phil Salt Century : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टने आपल्या तुफानी फलंदाजीने कहर केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फिल सॉल्टने 190.74 च्या स्ट्राईक रेटने 54 चेंडूत 103 धावांची नाबाद खेळी केली. या डावात त्याने 9 चौकार आणि 6 षटकार ठोकले. अशा प्रकारे सॉल्टने जागेवरून केवळ 15 चेंडूत चौकारांवर 72 धावा वसूल केल्या. त्याच्या या दमदार खेळीच्य जोरावर इंग्लंडने हा सामना 8 गडी राखून जिंकला.
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला सुरुवातीच्या षटकांमध्ये तीन मोठे धक्के बसले. सलामीवीर ब्रेंडन किंग 3 तर एविन लुईस 13 धावा करून बाद झाला. शिमरॉन हेटमायरला खातेही उघडता आले नाही. निकोलस पूरन आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल या जोडीने धावसंख्या 50 च्या पुढे नेली. 59 धावांवर पॉवेल (18 धावा)ची विकेट पडली. शेरफेन रदरफोर्डच्या बॅटमधून फक्त 2 धावा आल्या. आंद्रे रसेलने स्फोटक शैली दाखवत 17 चेंडूत चार षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. पुरनने 29 चेंडूंचा सामना केला मात्र त्याला केवळ 38 धावा करता आल्या. सरतेशेवटी, रोमारियो शेफर्डने 22 चेंडूत नाबाद 35 धावा आणि गुडाकेश मोतीने 14 चेंडूत 33 धावा करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. इंग्लंडकडून साकिब महमूदने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर आदिल रशीदला तीन बळी मिळाले.
विल जॅकसह सॉल्टने लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 5.6 षटकात 73 धावा जोडल्या. ज्यात जॅकचे योगदान फक्त 17 धावांचे होते. कर्णधार जोस बटलरचे पुनरागमन निराशाजनक राहिले. तो गोल्डन डकवर बाद झाला. येथून सॉल्टला जेकब बेथलची साथ लाभली आणि दोघांनी 107 धावांची नाबाद भागीदारी करत 17 व्या षटकातच आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बेथलने 36 चेंडूत नाबाद 58 धावा फटकावल्या.
सॉल्टचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले आहे. त्याने ही तिन्ही शतके विंडिजविरुद्ध झळकावली आहेत. त्याला नुकतेच केकेआरने आयपीएलमध्ये रिटेन ठेवलेले नाही.
फिल सॉल्ट (इंग्लंड) : वेस्ट इंडिजविरुद्ध 3 शतके
लेस्ली डनबार (सर्बिया) : बल्गेरियाविरुद्ध 2 शतके
एविन लुईस (वेस्ट इंडिज) : भारताविरुद्ध 2 शतके
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) : भारताविरुद्ध 2 शतके
मुहम्मद वसीम (युएई) : आयर्लंडविरुद्ध 2 शतके
सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने हा आकडा 32 व्या डावात गाठला. तो T20I मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. त्याने केविन पीटरसनची बरोबरी केली आहे. पीटरसनने T20I मध्ये 32 डावात 1000 धावाही पूर्ण केल्या होत्या.