या कसोटी मालिकेतील या ‘ओव्हल’च्या शेवटच्या कसोटीची स्थिती ही मालिकेच्या पहिल्या हेडिंग्ले कसोटीसारखीच झाल्याने जणू काही एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. पहिल्या कसोटीत आपण सहा धावांची नाममात्र आघाडी घेतली होती आणि दुसरा डाव म्हणजे एक डावाची कसोटी झाली होती. या ‘ओव्हल’ कसोटीत इंग्लंडने 23 धावांची किरकोळ आघाडी घेतल्याने या कसोटी मालिकेचा समारोपही एका डावाच्या कसोटीने होणार आहे. यासाठी प्रथम अभिनंदन केले पाहिजे ते भारतीय जलदगती गोलंदाजांचे. भारताचा डाव आटोपल्यावर डकेट आणि क्राऊली या इंग्लिश सलामीवीरांनी अशी धडाकेबाज सुरुवात केली की उपाहारापर्यंत सामना भारतापासून दूर चालला आहे, हे स्पष्ट दिसत होते. उपाहार ते चहापानाच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना दिशा, टप्पा सर्व काही मिळाले आणि ढगाळ हवामानाचा फायदा घेत सिराज आणि कंपनीने इंग्लंडचा डाव गुंडाळला. कुलदीप यादवची कमतरता भासली नाही. कारण, या वातावरणात जडेजाची दोन षटके सोडली, तर आपण फिरकीच्या वाट्याला न जाताच केवळ 51 षटकांत इंग्लंडचा डाव गुंडाळला.
सकाळी भारताने जेव्हा दुसर्या दिवशी आपला डाव पुढे चालू केला, तेव्हा फलंदाजी मजबूत करायला घेतलेला करुण नायर आणि ‘ओल्ड ट्रॅफर्ड’चा शतकवीर वॉशिंग्टन सुंदर भारताला अडीचशेचा टप्पा गाठून द्यायची अपेक्षा होती. लंडनला हवामान अजून ढगाळ असले, तरी पहिल्या दिवसाइतके काळे ढग आकाशात नव्हते. या हवामानात चेंडू चांगलाच स्विंग होत होता आणि सिम मुव्हमेंटही गालंदाजांना मिळत होती. दिवसाच्या टंगच्या पहिल्याच षटकात दोन चौकार वसूल करून ही भागीदारी भारताला सुस्थितीत नेईल, अशा आशा वाढल्या होत्या; पण टंगने आपल्या पुढच्याच षटकात नायरला पायचीत करून ही भागीदारी तोडली. टंगची या सामन्यातील गोलंदाजी स्वैर होती; पण त्याचे जडेजा, सुदर्शन आणि शुक्रवारी नायरला बाद करणारे चेंडू अप्रतिम होते. इंग्लंडच्या या नव्या गोलंदाजीच्या चमूला पहिल्या दिवशीही अजून यश मिळाले असते; पण त्यांनी लेंग्थमध्ये सातत्य राखले नव्हते. पहिल्या दिवशी गोलंदाजांना 0.74 अंशांची सिम मुव्हमेंट मिळाली होती. या मालिकेतल्या सर्व सामन्यांत ही सर्वोत्तम सिम मुव्हमेंट होती. दुसर्या दिवशीही सकाळी इंग्लंडच्या गोलंदाजांना उत्तम मदत मिळत होती आणि पहिल्या दिवसापेक्षा त्यांनी आपल्या लेंग्थमध्ये सातत्य राखले.
नायर बाद झाल्यावर एकच आशा होती, ती सुंदरवर; पण अॅटकिन्सनच्या पुढच्याच षटकात तो आखूड टप्प्यावर बाद झाला. पहिल्या वीस मिनिटांत आपले भरवशाचे फलंदाज बाद झाल्यावर या वातावरणात गोलंदाजांनी तग धरून उभे राहण्याची अपेक्षा नव्हती. सकाळी केवळ चौतीस चेंडूंत भारताचा डाव 224 धावांत आटोपला. अपेक्षेपेक्षा पन्नास धावा भारताने कमी केल्याने भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या फलंदाजांना काबूत ठेवण्याची मोठी जबाबदारी होती. सिराजने पहिले षटक टाकताना आपली सिम उत्तम ठेवत चेंडू फलंदाजांच्या खेळायला लावले; पण इंग्लंडच्या सलामीवीरांचे इरादे वेगळेच होते.
शुक्रवारचे दुसरे सत्र हे भारतासाठी महत्त्वाचे होते. सकाळी भारताचा डाव गडगडल्यावर बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी कधी पारंपरिक, तर कधी रिव्हर्स स्कूपसारखे आधुनिक फटके मारत हल्लाबोल चढवला आणि आपल्या गोलंदाजांची लय बिघडवली. नव्या चेंडूचा आणि पोषक वातावरणाचा फायदा सिराज आणि आकाश दीप यांना मिळून द्यायचा नसेल, तर त्यांच्यावर आक्रमण करून त्यांचा र्हिदम बिघडवणे इंग्लंडला गरजेचे होते. लय बिघडवायचे काम करताना त्यांनी टी-20च्या रेटने धावा काढल्या. यांना कसे रोखायचे याचे उत्तर गिलकडे नव्हते आणि पुन्हा एकदा कठीण परिस्थिती आल्यावर गिल हतबल झालेला दिसला. डकेट आणि क्राऊलीने सिराजवर हल्ला केला. प्रमुख गोलंदाजाला नेस्तनाबूत केले की, बाकीच्या अननुभवी गोलंदाजांवर त्याचा परिणाम होईल, ही त्या मागची रणनीती होती. भारताला यावेळी उणीव भासत होती, ती स्विंग करू शकणार्या चौथ्या गोलंदाजाची. सिराज, आकाश दीप आणि कृष्णा सर्वांनी उत्तम गोलंदाजी केली; पण त्यांचे सामन्यातील वर्कलोड सांभाळताना गिलची कसरत होती. जलदगती गोलंदाजानाच बळी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांचा मारा चालू ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.
क्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ नसतो हे मान्य असले, तरी अशा वेळी अर्शदीपच्या नैसर्गिक अॅक्शनचा फायदा इथे झाला असता. त्याचे उजव्या हाताने फलंदाजी करणार्या फलंदाजांच्या ऑफ स्टम्पच्या बाहेरून जाणारे चेंडू उपयोगी पडले असते. उपाहाराला फक्त 16 षटकांत 1 बाद 106 अशा सुस्थितीत असलेले इंग्लंड मोठी धावसंख्या उभारणार हे स्पष्ट होते. प्रसिद्ध कृष्णाने प्रथम आखूड टप्प्याच्या चेंडूवर क्राऊलीला झेल द्यायला लावल्यावर सिराजने मोठा स्पेल टाकून ब्रूक आणि धोकादायक रूटला पायचीत करून इंग्लंडला धक्के दिले. सिराजने एजबॅस्टनप्रमाणे प्रमुख गोलंदाजाची जबाबदारी घेताना अप्रतिम गोलंदाजी केली. सिराजचा हा उपाहारानंतरचा स्पेल इंग्लंडला बॅकफूटवर ढकलणारा होता. सकाळी थोडा वेळ आलेले ऊन जाऊन आकाशात पुन्हा ढग आले आणि सिराजने हातभर स्विंग मिळवला. प्रसिद्ध कृष्णावर या सामन्यात मोठी जबाबदारी होती आणि त्याच्या सुमार कामगिरीनंतरही त्याचा संघात समावेश झाल्याने तो टीकेचा धनीही झाला होता. या सामन्यात मात्र त्याने चेंडूचा टप्पा पुढे ठेवत सुरेख गोलंदाजी केली, हे मान्य करावेच लागेल. सिराजने मधली फळी कापून काढली, तर कृष्णाने क्राऊली, स्मिथसारख्या मोठ्या बळींबरोबरच इंग्लंडचे शेपूट जास्त वळवळू दिले नाही.
भारताचा दुसरा डाव चालू झाला तेव्हाही जलदगती गोलंदाजांना मदत मिळेल असेच वातावरण होते. भारताला थोडा धोका घेऊन धावा जमवणे गरजेचे होते. चेंडूला इतकी मुव्हमेंट मिळत होती की, नुसते चेंडू खेळून काढणे म्हणजे बॅटची कड लागून झेल द्यायला आमंत्रण होते. काही चेंडू अचानक खाली बसत होते. यशस्वी जैस्वालने हा धोका पत्करायचे ठरवले आणि त्याने काही सुरेख तर काही धोकादायक फटके खेळत वेगाने धावा काढल्या. दुसरीकडे बचावात्मक खेळताना राहुल आणि दिवसाच्या शेवटच्या षटकात सुदर्शन बाद झाले. आज यशस्वी जैस्वालची खेळी सामन्याचा कल ठरवणारी ठरू शकते. या खेळपट्टीवर इंग्लंडला अडीचशे धावांचे लक्ष्यही आव्हानात्मक ठरू शकेल. या कसोटीत पहिल्यांदाच कसोटी चार दिवसांत संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजचे सकाळचे सत्र भारताने जिंकले, तर भारताला सामन्यात वर्चस्व राखण्याची संधी आहे.