गुवाहाटी; वृत्तसंस्था : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडने आपल्या मोहिमेची सुरुवात जोरदार केली आहे. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडने शुक्रवारी झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 10 गडी राखून सहज पराभूत केले.
इंग्लंडची गोलंदाजी, विशेषत: स्पिनर्स, इतकी भेदक होती की त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 69 धावांवर गुंडाळला. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. डावखुरी फिरकीपटू लिन्सी स्मिथ हिने 4 षटकांत 2 निर्धाव षटके टाकत केवळ 7 धावा देत 3 बळी घेतले आणि इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. स्मिथने दुसर्याच षटकात कर्णधार लॉरा वोलव्हार्डटला बाद केले. स्मिथला सोफी एक्लेस्टोन (2/19) आणि चार्ली डीन (2/14) यांनी साथ दिली. कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट (2/5) हिनेही दोन बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून सिनालो जाफ्ता (22 धावा) दुहेरी आकडा गाठू शकली.
केवळ 70 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने हे आव्हान 14.1 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. सलामीवीर एमी जोन्सने नाबाद 40 आणि टॅमी ब्यूमॉन्टने नाबाद 21 धावा काढल्या.