लंडन; वृत्तसंस्था : ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचे मोठे आव्हान ठेवले असून याचा पाठलाग करताना इंग्लंडने तिसर्या दिवसअखेरीस 1 बाद 50 धावा जमवल्या. क्राऊली व डकेट यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण, सिराजने शेवटच्या षटकात क्राऊलीला बाद करत सामन्यात रंगत भरली. डकेट 34 धावांवर नाबाद राहिला.
शनिवारी, सामन्याच्या तिसर्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या (118) शानदार शतकाच्या जोरावर भारताने दुसर्या डावात इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. त्याला नाईट वॉचमन आकाश दीप (66), रवींद्र जडेजा ़(53)आणि वॉशिंग्टन सुंदर (53) यांच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकांची जोड मिळाल्याने भारताला आपल्या दुसर्या डावात 88 षटकांत सर्वबाद 396 धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यानंतर इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले.
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावत भारतीय डावाचा कणा ठरला. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे, त्याला तीन वेळा जीवदान मिळाले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. इंग्लंडच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा हा नमुना होता, जिथे त्यांनी भारताच्या दुसर्या डावात एकूण सहा झेल सोडले. जडेजाने या मालिकेत 500 धावांचा टप्पाही ओलांडला, तर सुंदरने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करत भारताची आघाडी 350 धावांच्या पार नेली.
इंग्लंडकडून जोश टंगने 5 बळी घेत एकाकी झुंज दिली, पण प्रमुख गोलंदाज ख्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत इतर गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले. भारताने प्रति षटक चारपेक्षा जास्तच्या गतीने धावा जमवल्या.