इंग्‍लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन एका षटकात तब्‍बल २८ धावा फटकावत वेगवान गाेलंदाजीमधील स्‍टार्क नावाची दडपणच झुगारुन लावले.  Pudhari
स्पोर्ट्स

6,0,6,6,6,4 लिव्हिंगस्टोनने उडवला मिचेल स्टार्कचा 'धुरळा' (पाहा व्‍हिडिओ)

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मिचेल स्‍टार्कच्‍या गाेलंदाजीला सामाेरे जायचं म्‍हटलं की, काही अपवाद वगळता जगभरातील फलंदाजांना धडकी भरते. मिचेलचा वेग आणि स्‍विंगसमाेर भल्‍याभल्‍यांची भंबेरी उडते. मात्र इंग्‍लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन याने स्‍टार्क नावाचे दडपणच झुगारुन लावले. त्‍याने स्टार्कच्‍या षटकात तब्‍बल २८ धावा फटकावल्‍या. या खेळीमुळे स्टार्कच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमाची नाेंद झालीआहे. ताे ऑस्ट्रेलियाच्‍या वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्‍ट्रेलियाच्‍या वनडे इतिहासातील सर्वात महागडे षटक

मिचेल स्टार्कच्या आधी ऑस्ट्रेलियन एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम झेवियर डोहर्टीच्या नावावर होता, ज्याने 2013 मध्ये भारताविरुद्ध एका षटकात 26 धावा दिल्या होत्या. झेवियर डोहर्टीशिवाय कॅमेरून ग्रीन आणि ॲडम झाम्पा यांनीही एका षटकात २६-२६ धावा दिल्या आहेत. पण आता क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध मिचेल स्टार्कच्या नावावर या विक्रमाची भर पडली आहे.इंग्लंडच्या डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कने २८ धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियन वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकणारा गोलंदाज ठरला. लियाम लिव्हिंगस्टोनच्या स्फोटक फलंदाजीमुळे स्टार्कच्या नावावर हा लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन याने स्टार्कच्‍या षटकात ४ षटकारांसह १ चौकार लगावला.

मालिकेतील चाैथ्‍या वनडे सामन्‍यात काय घडलं ?

ऑस्‍ट्रेलिया-इंग्‍लंड वनडे मालिकेतील चौथ्‍या सामना लॉर्ड्सवर खेळला गेला. पावसामुळे सामन्‍यात व्यत्यय आला. ५० षटकांचा सामना ३९ षटकांवर आला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत ३१२ धावा केल्‍या. कर्णधार हॅरी ब्रूकसह लिव्हिंगस्टोनने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. ब्रूकने ५८ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकार लगावत सर्वाधिक 87 धावांची खेळी केली, तर लिव्हिंगस्टोनने केवळ २७ चेंडूत तडाखेबाज ६२ धावा फटकावल्‍या. तो नाबाद राहिला. लिव्हिंगस्टोनने आपल्‍या ६२ धावांच्‍या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकार लगावले. ३१३ धावांचा पाठलाग करताना ऑस्‍ट्रेलियाचा संघ केवळ १२६ धावांतच तंबूत परतला. संघाला इंग्लंडकडून १८६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. त्यापैकी दोघांना खाते उघडता आले नाही. यामध्ये स्टीव्ह स्मिथ (5), जोश इंग्लिस (8), मार्नस लॅबुशेन (4), ग्लेन मॅक्सवेल (2), स्टार्क (3*) यांचा समावेश आहे. ॲडम झाम्पा आणि हेजलवूड यांना खातेही उघडता आले नाही. वनडे क्रिकेटच्‍या इतिहासातील धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हा चौथा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. इंग्लंडच्‍या मॅथ्यू पॉट्सने चार बळी घेतले. तर ब्रेडन कारसेने तीन आणि जोफ्रा आर्चरने दोन बळी घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT