England vs Australia | इंग्लंडच्या विजयाचा दुष्काळ संपुष्टात! File photo
स्पोर्ट्स

England vs Australia | इंग्लंडच्या विजयाचा दुष्काळ संपुष्टात!

ऑस्ट्रेलियातील 18 सामन्यांची पराभवाची मालिका खंडित; दोनच दिवसांत इंग्लंडची बाजी

पुढारी वृत्तसेवा

मेलबर्न; वृत्तसंस्था : 2013-14 पासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील इंग्लंडचा विजयाचा दुष्काळ अखेर मेलबर्नमध्ये शनिवारी संपुष्टात आला. येथील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाची अक्षरश: धूळधाण उडवत अवघ्या दोनच दिवसांत अविस्मरणीय विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही अवघ्या 132 धावांत गुंडाळल्यानंतर विजयासाठीचे 175 धावांचे लक्ष्य 32.2 षटकांत 6 गड्यांच्या बदल्यात पार केले. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया तूर्तास 3-1 फरकाने आघाडीवर आहे.

विजयासाठी 175 धावांची आवश्यकता असताना इंग्लंडला यासाठी 6 गडी जरूर गमवावे लागले. मात्र, त्यांनी केलेला संघर्ष लक्षवेधी ठरला. प्रारंभी झॅक क्राऊली व बेन डकेट यांनी 51 धावांची सलामी दिल्यानंतर तिसर्‍या क्रमांकावरील ब्रायडन कार्स अवघ्या 6 धावांवर तंबूत परतला. मात्र, त्यानंतर जेकब बेथेलने 45 चेंडूंत 40 धावा जमवत डाव सावरत विजयाकडे आगेकूच कायम ठेवली. जो रूट 15 तर बेन स्टोक्सही 2 धावांवर बाद झाल्याने थोडी खळबळ उडाली. मात्र 18 धावांवर नाबाद राहिलेल्या हॅरी ब्रूक ने जेमी स्मिथसह (नाबाद 3) विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पर्थ, ब्रिस्बेन आणि अ‍ॅडलेड येथील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून अवघ्या 11 दिवसांच्या खेळात अ‍ॅशेस मालिका जिंकली आहे. मात्र, इंग्लंडने येथील एमसीजीवर चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा केवळ दोनच दिवसांत फज्जा पाडत आश्चर्याचा धक्का दिला.

0 : मेलबर्न कसोटीत फिरकी गोलंदाजांनी एकही षटक टाकले नाही, अशी ऑस्ट्रेलियातील ही पहिलीच कसोटी ठरली. यापूर्वी 1984 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ कसोटीत फिरकीपटूंनी केवळ 2 षटके टाकली होती.

2 : ऑस्ट्रेलियाने या मालिकेत पर्थमध्येही दोन दिवसांत विजय मिळवला होता. एकाच कसोटी मालिकेतील दोन सामने दोनच दिवसांत निकाली लागण्याची ही 129 वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

46 : मेलबर्न कसोटीच्या दुसर्‍या डावात ट्रॅव्हिस हेडने केलेल्या 46 धावा ही या सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियातील ही पाचवी अशी कसोटी ठरली, ज्यात एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.

450 : या अ‍ॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या 450 पुरुष कसोटी सामन्यांपैकी केवळ 2 सामने दोन दिवसांत संपले. यात 1931 मधील विंडीजविरुद्धची मेलबर्न कसोटी आणि 2022 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ब्रिस्बेन कसोटीचा समावेश आहे.

5468 : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियातील मागील विजयापासून (जानेवारी 2011 मधील सिडनी कसोटी) मेलबर्न येथील विजयादरम्यानचा कालावधी 5,468 दिवस इतका होता. या दरम्यान इंग्लंडने ऑस्ट्रेलियात 18 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 16 गमावले.

5571 : 2025-26 अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये एकूण 5,571 चेंडू टाकण्यात आले, यापूर्वी, 1902 च्या अ‍ॅशेस मालिकेत 4,675 तर 1985-86 च्या विस्डेन ट्रॉफीमध्ये 5,513 चेंडू टाकले गेले होते.

92,045 : शनिवारी एमसीजीवर 92,045 प्रेक्षक उपस्थित होते, हा देखील ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांसाठी सर्वाधिक उपस्थितीचा दुसरा विक्रम आहे. पहिल्या दिवशी 94,199 प्रेक्षक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT