पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. जोस बटलर व्यतिरिक्त, मलान हा एकमेव इंग्लंडचा खेळाडू आहे ज्याने सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो इंग्लिश संघातून बाहेर आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही स्थान मिळाले नाही. त्यानंतरच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
37 वर्षीय मलान हा टी-20 फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर वन राहिला आहे. त्याने 2017 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यातूनच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्याने इंग्लंडकडून 22 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 62 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीमध्ये या इंग्लंडच्या खेळाडूने 27.53 च्या सरासरीने 1074 धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 55.76 च्या सरासरीने 1,450 धावा केल्या. टी-20 मध्ये त्याने 36.38 च्या सरासरीने 1,892 धावा केल्या. मलानने कसोटी आणि टी-20 मध्ये प्रत्येकी 1 शतक आणि एकदिवसीय सामन्यात 6 शतके झळकावली आहेत.
सप्टेंबर 2020 मध्ये, मलान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज बनला. हा खेळाडू 2022 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाचाही भाग होता. बटलरच्या संघाने तो विश्वचषक जिंकला होता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो बाद फेरीतून बाहेर पडला. या खेळाडूने 2022 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.
मलानने 2023 मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 18 एकदिवसीय सामने खेळले, 58.52 च्या सरासरीने आणि 98.32 च्या स्ट्राइक रेटने 995 धावा केल्या. या काळात त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतकांसह 140 धावा फटकावल्या. तो 2023 मध्ये इंग्लंडसाठी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 2022 मध्ये त्याने 6 डावात 59.40 च्या सरासरीने 297 धावा केल्या.
मलानने आपल्या कारकिर्दीत सर्व फॉरमॅटसह एकूण 51 शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर 29 हजारांहून अधिक धावा आहेत. मलानच्या फर्स्ट क्लासमध्ये 13201 धावा, लिस्ट ए मध्ये 6561 आणि टी-20 मध्ये 9609 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावावर 1450 धावा आणि सहा शतके आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत आपण काही विशेष करू शकलो नाही याची मलानला खंत आहे. त्याने 22 कसोटी सामन्यात 1074 धावा केल्या. 2022 पासून तो कसोटी फॉरमॅट खेळलेला नाही.