पुढारी ऑनलाईन डेस्क : England vs New Zealand T20 : इंग्लंडने क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. दुसऱ्या डावात टॉम लॅथमच्या संघाने केवळ 104 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग इंग्लंडने केवळ 12.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केला. यासह बेन स्टोक्सच्या इंग्लिश संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हॅरी ब्रूक आणि ब्रेडेन कार्स हे या सामन्याचे नायक ठरले. ब्रूकने 171 धावांची शानदार खेळी केली. तर कार्सने संपूर्ण सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. हा सामना जिंकून इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला फायदा करून दिला आहे.
तत्पूर्वी, स्टोक्सने नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली आणि पहिल्या डावात त्यांना 348 धावांवर रोखण्यात यश मिळविले. केन विल्यमसनने 93 धावा केल्या. यादरम्यान ब्रेडन कार्सने अप्रतिम गोलंदाजी करत 19 षटकात 64 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लंडने 499 धावा केल्या आणि 151 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात कार्सने प्राणघातक गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला केवळ 254 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे टॉम लॅथमच्या संघाला केवळ 104 धावांचे लक्ष्य ठेवता आले, जे इंग्लंडने केवळ 12.4 षटकांत पूर्ण केले.
वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्याच षटकात जॅक क्रोली बाद झाला, पण त्यानंतर बेन डकेट आणि जेकब बॅचलरने आक्रमक शॉट्स खेळले. आठव्या षटकात 27 धावा काढून डकेट बाद झाला. त्याच षटकात नवा फलंदाज जो रूटने सलग तीन चेंडूत तीन चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. जेकब बेथलेने पहिले कसोटी अर्धशतक अवघ्या 37 चेंडूत झळकावून इंग्लंडला 12.4 षटकांत 104 धावांचे लक्ष्य गाठले. जो रूट 15 चेंडूत 23 धावा करून नाबाद परतला.
या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत अघाडी घेतली. न्यूझीलंडच्या पराभवाचे त्याचे क्षेत्ररक्षण हेही मोठे कारण ठरले. संघाने पहिल्या डावात 8 झेल सोडले होते. यामध्ये 5 झेल हॅरी ब्रूकचे होते, ज्याने शतकी खेळी केली. तर फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, इंग्लिश संघाने न्यूझीलंडला प्रत्येक विभागात पराभूत करण्यात कसलीच कसर सोडली नाही.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनही या सामन्यात 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो पहिला किवी फलंदाज ठरला आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणारा विल्यमसन भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात त्याने ही कामगिरी केली. पहिल्या डावातील 93 धावांनंतर विल्यमसनने दुसऱ्या डावात 61 धावा केल्या. 34 वर्षीय खेळाडूने 103 कसोटी सामन्यांमध्ये 9000 कसोटी धावा करण्याचा पराक्रम केला. तो श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि पाकिस्तानचा युनूस खान यांच्यासह सर्वात वेगवान 9000 कसोटी धावा करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे. त्याने ही कामगिरी 99व्या कसोटीत केली होती. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (101 कसोटी) दुस-यास्थानी आहे.