पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या स्फोटक फलंदाजावर बोर्डाने बंदी घातली आहे. या फलंदाजाने आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले होते. आता नवीन नियमानुसार, बीसीसीआयने या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यास दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. हा युवा फलंदाज इंग्लंडचा हॅरी ब्रुक आहे.
आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रूकला करारबद्ध केले होते. यानंतर, त्याला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 6.5 कोटी रुपयांना खरेदी केले. तथापि, हंगाम सुरू होण्यापूर्वीच ब्रूकने स्पर्धेतून माघार घेतली. ब्रूकने एक निवेदन जारी करून म्हटले होते की तो सध्या इंग्लंड क्रिकेटला अधिक प्राधान्य देत आहे आणि त्यामुळे तो आयपीएलच्या 18 व्या हंगामात खेळू शकणार नाही.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) यापूर्वी हॅरी ब्रुक आयपीएलमध्ये खेळू नये याबद्दल बीसीसीआयशी संपर्क साधला होता. त्यानंतर बीसीसीआयमार्फत ही माहिती दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीला देण्यात आली.
बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, ‘हॅरी ब्रूकला आयपीएलमधून 2 वर्षांसाठी बंदी घालण्याबाबत ईसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे.’
सूत्राने सांगितले की, गेल्या वर्षी लिलावापूर्वी सर्व खेळाडूंना नवीन नियमांची माहिती देण्यात आली होती. बोर्डाने हे नवीन नियम तयार केले आहेत आणि प्रत्येक खेळाडूला नवीन नियमांचे पालन करावे लागेल.
ब्रुकने सोशल मीडियाद्वारे त्याच्या निर्णयाची माहिती दिली. याबद्दल त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने म्हटले की, ‘आयपीएलच्या पुढील हंगामातून माघार घेण्याचा मी खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागतो. इंग्लंड क्रिकेटसाठी हा खरोखरच महत्त्वाचा काळ आहे आणि मी आगामी मालिकेच्या तयारीसाठी पूर्णपणे वचनबद्ध राहू इच्छितो. यासाठी, माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात व्यस्त टप्प्यानंतर मला स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी वेळ हवा आहे. मला माहित आहे की सर्वांना ते समजणार नाही आणि मी त्यांच्याकडून अशी अपेक्षाही करत नाही, पण मला जे योग्य वाटेल ते मला करावे लागेल. माझ्या देशासाठी खेळणे ही माझी प्राथमिकता आहे आणि तेच माझे पूर्ण लक्ष आहे.’
आजीच्या निधनामुळे ब्रुकने आयपीएलच्या मागील हंगामातूनही माघार घेतली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल नियमांनुसार, जर एखाद्या परदेशी खेळाडूची लिलावात निवड झाली आणि तो फिट नसल्याने स्पर्धेत खेळला नाही, तर त्याला दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
गेल्या वर्षी संघांसोबत शेअर केलेल्या बीसीसीआयच्या कागदपत्रांनुसार, ‘कोणताही (परदेशी) खेळाडू जो लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध घोषित करतो, त्याला आयपीएल आणि आयपीएल लिलावात दोन हंगामांसाठी भाग घेण्यास बंदी घातली जाईल.’