पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. क्रमवारीत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट गेल्या काही काळापासून अव्वल स्थानी वर्चस्व गाजवत होता, मात्र त्याने हे स्थान गमावले आहे. त्याचा संघ सहकारी हॅरी ब्रूक आता कसोटीतील टॉपचा फलंदाज बनला आहे.
इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून दोन्ही संघामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. या दोन्ही सामन्यांत ब्रूकने चमकदार कामगिरी केली. त्याने दोन सामन्यांच्या तीन डावात त्याने 116.33 च्या सरासरीने 349 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात तर त्याने शतकी आणि अर्धशतकी खेळे साकारली. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 123 तर दुसऱ्या डावात त्याने 55 धावा फटकावल्या. याच कामगिरीचा फायदा ब्रूकला आयसीसी क्रमवारीत मिळाला आणि तो जो रूटला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला. त्याच्या खात्यात 898 रेटिंग जमा झाले आहे.
दुसऱ्या स्थानावरील जो रूटचे रेटिंग 897 आहे. केन विल्यमसन 812 रेटिंगसह तिसऱ्या तर भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 811 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. ट्रॅव्हिस हेड (781) पाचव्या स्थानी पोहचला आहे.
ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडकडून 23 कसोटी सामने खेळले असून 61.61 च्या सरासरीने 2280 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 शतके आणि 10 अर्धशतके फटकावली आहेत. तर 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 39.94 च्या सरासरीने 719 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 39 टी-20 सामन्यांमध्ये 30.73 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रूकला आयपीएल 2025 साठी आपल्या संघाचा भाग बनवले आहे. तो भारतीय भूमीवर कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल.