बेन डकेट Twitter
स्पोर्ट्स

बेन डकेटच्या सर्वात वेगवान 2000 कसोटी धावा! सेहवाग-पंतला टाकले मागे

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan vs England Test : पहिल्या कसोटीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या 366 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने बुधवारी झटपट धावा केल्या आणि यजमान संघावर दबाव आणला. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करत शतक झळकावले. त्याचे हे चौथे कसोटी शतक आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने सर्वात कमी चेंडूत त्याने हा पल्ला गाठला आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे खेळला जात आहे. या सामन्यात कामरान गुलामच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने 366 धावा केल्या. बाबर आझमच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलामने मंगळवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी 118 धावांची खेळी केली. सामन्याचा पहिला दिवस कामरान गुलामच्या नावावर राहिल. तर दुसरा दिवस बेन डकेटने गाजवला.

47 चेंडूत अर्धशतक

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेन डकेटने शतक झळकावून इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. त्याने शतक पूर्ण केले तेव्हा इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 195 धावा होती. डकेटने सुरुवातीपासूनच वेगवान फलंदाजी केली आणि करत 47 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, पुढील 50 धावा पूर्ण करण्यासाठी त्याने जादाचे चेंडू खेळले.

डकेटचे संथ शतक

डकेटने 119 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील सर्वात संथ शतक ठरले आहे. त्याने भारताविरुद्ध 88 चेंडूत कसोटी शतक झळकावले आहे. याशिवाय पाकिस्तानविरुद्ध 105 चेंडूत आणि आयर्लंडविरुद्ध 106 चेंडूत शतके पूर्ण केली आहेत. शतक पूर्ण केल्यानंतर डकेट जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. तो 114 धावांवर साजिद खानच्या चेंडूवर आगा सलमानकरवी झेलबाद झाला.

डकेटने मोडला विश्वविक्रम

डकेटने चारपैकी 3 शतके विदेशी भूमीवर झळकावली आहेत. त्याच्या नावावर 15 कसोटी अर्धशतके आहेत. यापैकी 9 अर्धशतकी ही 100 किंवा त्याहून अधिक स्ट्राइक-रेटने फटकावली आहेत. याबाबतीत जो रूट देखील त्याच्या बरोबरीत आहे. डकेटने आपल्या शतकी खेळीत कसोटी क्रिकेटमधील विश्वविक्रमही मोडीत काढला. त्याने 88 धावा करताच कसोटी क्रिकेटमधील 2000 धावा पूर्ण केल्या. कसोटीत त्याने सर्वात कमी चेंडू खेळून ही कामगिरी आपल्या नावावर केली. याआधी हा विक्रम टीम साऊदीच्या नावावर होता ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2418 चेंडूंचा सामना करत 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. आता हा विक्रम डकेटच्या नावावर आहे. इंग्लिश फलंदाजाने हा विक्रम 2293 चेंडूंतच केला आहे.

कसोटी सामन्यांमध्ये कमी चेंडूत सर्वात जलद 2000 धावा करणारे फलंदाज

2293 चेंडू : बेन डकेट

2418 चेंडू : - टिम साउथी

2483 चेंडू : ॲडम गिलख्रिस्ट

2759 चेंडू : वीरेंद्र सेहवाग

2797 चेंडू : ऋषभ पंत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT