वेस्ट इंडिज संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना 1 जून रोजी कार्डिफ येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या आधी गस अॅटकिन्सन आणि जोफ्रा आर्चर यांनाही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले होते.
इंग्लंडने पहिली वनडे 238 धावांनी जिंकली. याच सामन्यादरम्यान जेमी ओव्हरटनला दुखापत झाली होती. त्या सामन्यात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते. आता तो इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली फिटनेसवर काम करेल. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूला बदली म्हणून समाविष्ट केले जाणार नाही.
ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इंग्लंड आणि सरेचा अष्टपैलू जेमी ओव्हरटन याच्या उजव्या हाताच्या करंगळीत फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरीत वनडे सामन्यांमधून आणि आगामी टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. गुरुवारी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान ओव्हरटनला ही दुखापत झाली. आता तो इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार होतील. त्याच्या जागी वनडे संघात कोणत्याही खेळाडूचा समावेश केला जाणार नाही.’
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडच्या अंतिम इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त ओव्हरटनच्या जागी मॅथ्यू पॉट्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. पॉट्सचा हा 10 वा एकदिवसीय सामना असेल. जर इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला तर त्यांना मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी मिळेल.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : बेन डकेट, जेमी स्मिथ, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जेकब बेथेल, विल जॅक्स, ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, साकिब महमूद