पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा 323 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 583 धावांचे मोठे लक्ष्य होते, मात्र यजमान किवी संघ दुसऱ्या डावात 259 धावांवर गारद झाला. या विजयासह इंग्लिश संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात 280 धावा केल्या. हॅरी ब्रूकने (123) शतक झळकावले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 125 धावांत गुंडाळला. इंग्लंडच्या गुस ऍटकिन्सनने हॅट्ट्रीकसह चार बळी घेतले. तर ब्रेडन कार्सने चार विकेट मिळवल्या. पहिल्या डावातील 155 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लिश संघाने त्यांचा दुसरा डाव 6 बाद 427 धावांवर घोषित केला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रुटने शतक (106) झळकावले. तर बेन डकेट (92), जेकब बॅचेलर (96), हॅरी ब्रूक (55) आणि कर्णधार बेन स्टोक्स (नाबाद 49) यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.
पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 583 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र खेळाच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ 259 धावांत गडगडला. टॉम ब्लंडेल (115) वगळता इतर कोणताही फलंदाज टिकून राहू शकला नाही. बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हॅरी ब्रूकला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.
रूटने दुसऱ्या डावात 106 धावा केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 36 वे शतक ठरले. विशेष म्हणजे त्याचे या वर्षातील एकूण सहावे कसोटी शतक आहे. रूटने कसोटी कारकिर्दीत दुसऱ्यांदा एका कॅलेंडर वर्षात 6 कसोटी शतके झळकावली आहेत. याआधी त्याने 2021 मध्ये त्याने पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. त्याच्याशिवाय इंग्लंडकडून डेनिस कॉम्प्टन (1947) आणि जॉनी बेअरस्टो (2022) यांनी एका वर्षात 6 कसोटी शतके झळकावली आहेत.
इंग्लंडने मार्च 2008 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती. त्यानंतर इंग्लिश संघ चार वेळा न्यूझीलंड दौ-यावर गेला, पण एकदाही विजय मिळवता आला नाही. त्यांना सलग दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले. 2008 नंतर 2012-13 मध्ये खेळलेली तीन सामन्यांची मालिका 0-0 अशी बरोबरीत सुटली. 2017-18 मध्ये, न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली आणि 2019-20 मध्ये त्याची पुनरावृत्ती केली. 2022-23 मधील दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. आता 16 वर्षांनी अखेर इंग्लंडला न्यूझीलंडच्या धर्तीवर मालिका जिंकण्यात यश आले आहे.