स्पोर्ट्स

ENG vs IND Test : लीड्स कसोटीवर शोककळा! इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू क्रिकेटर लॉरेन्स यांचे निधन

रणजित गायकवाड

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू असतानाच, क्रिकेट विश्वासाठी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या वर्षभरापासून मोटर न्यूरॉन डिसऑर्डर (MND) या दुर्धर आजाराशी झुंज देत होते.

लॉरेन्स यांना 2024 मध्ये या आजाराचे निदान झाले होते. हा आजार थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि त्यावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. याच कारणामुळे, डेव्हिड लॉरेन्स या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करत होते.

डेव्हिड लॉरेन्स यांच्या निधनाने इंग्लंडच्या क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मौन पाळून डेव्हिड लॉरेन्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सर्व खेळाडू दंडावर काळ्या फिती बांधून मैदानात उतरले.

एका दुखापतीने संपवली कारकीर्द

एकेकाळी डेव्हिड लॉरेन्स यांची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जात असे, परंतु एका भयानक दुखापतीने त्यांची कारकीर्द अकाली संपुष्टात आणली. ते इंग्लंडसाठी केवळ 5 कसोटी सामनेच खेळू शकले. तथापि, ग्लुस्टरशायर कौंटीसाठी खेळताना त्यांनी 280 सामन्यांमध्ये 625 बळी घेण्याची प्रभावी कामगिरी केली.

हेडिंग्लेवर श्रद्धांजली

डेव्हिड लॉरेन्स यांनी 1988 साली इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले ब्रिटिश वंशाचे कृष्णवर्णीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला होता. 2022 साली ते आपल्या कौंटीचे (ग्लुस्टरशायर) पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. याच महिन्यात त्यांना ‘किंग्स बर्थडे ऑनर्स’मध्ये ‘एमबीई’ (MBE) या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

लॉरेन्स यांनी 1988 ते 1992 दरम्यान इंग्लंडसाठी पाच कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्सवर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 5 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी 18 बळी घेतले, ज्यात 1991 मध्ये ‘द ओव्हल’ मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध 106 धावांत 5 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. आपल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्यांनी 4 बळी मिळवले होते.

1992 मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीसाठी धावण्याच्या अखेरच्या टप्प्यात गुडघा निखळल्याने (fractured kneecap) त्यांची कारकीर्द अचानक संपली. या गंभीर दुखापतीनंतर त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांनी शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) क्षेत्रातही नशीब आजमावले आणि ते एका नाईट क्लबचे मालकही बनले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT