शिमकेंट (कझाकिस्तान); वृत्तसंस्था : भारतीय नेमबाज एलावेनिल वलारिवानने आपली शानदार कामगिरी सुरू ठेवत शुक्रवारी 16 व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत तिने चीन आणि कोरियाच्या नेमबाजांना मागे टाकत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. याशिवाय ऑलिम्पिकपटू मनू भाकरने कांस्यपदक पटकावले. भारताचे स्पर्धेतील हे तिसरे गोल्ड आहे. गुरुवारी भारताला पुरुष गटात दोन सुवर्णपदके मिळाली होती.
तामिळनाडूच्या या 26 वर्षीय खेळाडूने अंतिम फेरीत 253.6 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी विश्वचषक आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकणार्या एलावेनिलचे या स्पर्धेतील हे पहिलेच वैयक्तिक पदक आहे. याआधी तिने सांघिक स्पर्धांमध्ये रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली होती. चीनच्या शिनलू पेंगने 253 गुणांसह रौप्यपदक, तर कोरियाच्या युनजी क्वोनने 231.2 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानले.
या स्पर्धेत सहभागी झालेली दुसरी भारतीय खेळाडू मेहुली घोषचे पदक थोडक्यात हुकले. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत तिने 208.9 गुणांसह चौथे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, घोष पात्रता फेरीत 630.3 गुणांसह दहाव्या स्थानावर होती. मात्र, तिच्यापेक्षा चांगली कामगिरी करणार्या भारताच्याच दोन नेमबाज, आर्या बोरसे (633.2) आणि सोनम मस्कर (630.5) या केवळ रँकिंग गुणांसाठी खेळत असल्याने नियमानुसार मेहुलीला अंतिम फेरीत स्थान मिळाले होते. पात्रता फेरीत एलावेनिल 630.7 गुणांसह आठव्या स्थानी राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती.