Egypt Files FIFA Complaint | वादग्रस्त निर्णयांविरोधात इजिप्तची ‘फिफा’कडे तक्रार; मुख्‍य रेफ्रीला स्पर्धेतून हटवण्याची मागणी 
स्पोर्ट्स

Egypt Files FIFA Complaint | वादग्रस्त निर्णयांविरोधात इजिप्तची ‘फिफा’कडे तक्रार; मुख्‍य रेफ्रीला स्पर्धेतून हटवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अटलांटा; वृत्तसंस्‍था : फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध ३-२ असा धक्कादायक पराभव पत्‍करावा लागल्यानंतर इजिप्तने मुख्य रेफ्री फ्रँकोइस लेटेक्सियर यांच्‍या वादग्रस्त निर्णयांविरोधात ‘फिफा’कडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या सामन्यात झालेल्या गंभीर चुकांमुळे फ्रेंच रेफ्री लेटेक्सियर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला चालू विश्वचषकातून त्वरित हटवण्यात यावे, अशी मागणीही इजिप्तने केली आहे.

या सामन्यात इजिप्तने अप्रतिम खेळ करत यासेर इब्राहिम आणि मोस्तफा झिको यांच्या गोलच्या जोरावर २-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या ११ मिनिटांत अर्जेंटिनाने ३ गोल करत या सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले.

व्हीएआर निर्णयांवरून वाद

यादरम्‍यान, इजिप्तच्या छावणीत रेफ्रींच्या निर्णयांमुळे तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सामन्यादरम्यान इजिप्तचा एक महत्त्वाचा गोल ‘व्हीएआर’ पुनरावलोकनानंतर बाद करण्यात आला. तसेच, अर्जेंटिनाने निर्णायक गोल करण्यापूर्वी इजिप्तला पेनल्टी मिळायला हवी होती, त्‍याची पडताळणी रेफ्रींनी केली नाही. इजिप्त फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हानी अबो रिदा यांनी ‘फिफा’कडे सादर केलेल्या तक्रारीत या सर्व वादग्रस्त मुद्द्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मेस्‍सी व इजिप्‍तचे प्रशिक्षक हसन यांच्‍यात यादरम्‍यान राडा झाला. मेस्सीसोबतच्या वादानंतर हसन यांनी ‘अँटी-रेसिझम’ (वर्णद्वेष विरोधी) इशारा केला. यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. हा प्रकार पाहून मेस्सीही काही काळ अवाक्‌ झाला होता. शेवटी पंचांनी मध्यस्थी केली आणि मेस्सीच्या सहकाऱ्यांनी त्याला बाजूला नेत मैदानात परत आणले.

मेस्सीसाठी जाणीवपूर्वक मदत?

सामन्यानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक होसाम हसन यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्‍हणाले, ‘आम्ही गतविजेत्यांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात सरस होतो; पण मैदानावरील आणि मैदानाबाहेरील घटकांनी निकालावर प्रभाव पाडला. कदाचित त्यांना जागतिक विजेत्याला स्पर्धेत टिकवून ठेवायचे होते. मेस्सी विश्वचषकाच्या शर्यतीत राहावा, म्हणूनच अर्जेंटिनाला प्रत्येक पातळीवर मदत करण्यात आली.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT