स्पोर्ट्स

Ecuador FIFA World Cup : जर्मनीवरील महाविजयानंतर इक्वाडोरमध्ये सरकारी सुट्टी जाहीर!

राष्ट्राध्यक्ष भारावले; संपूर्ण देशात उत्सवाची घोषणा

रणजित गायकवाड

क्विटो (इक्वाडोर) : फिफा विश्वचषक २०२६ च्या ‘ग्रुप ई’ मधील आपल्या अंतिम साखळी सामन्यात इक्वाडोरने फुटबॉल जगताला मोठा धक्का दिला. गुरुवारी, २५ जून रोजी न्यूयॉर्कच्या न्यूजर्सी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात इक्वाडोरने चार वेळच्या माजी विजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली. या ऐतिहासिक आणि चमत्कारिक विजयाचे औचित्य साधत इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी देशभरात अधिकृत राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.

इक्वाडोरसाठी या स्पर्धेची सुरुवात अत्यंत आव्हानात्मक झाली होती. पहिल्या सामन्यात आयव्हरी कोस्टकडून १-० असा पराभव पत्करावा लागल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात कुरासाओविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यामुळे आधीच बाद फेरी गाठलेल्या बलाढ्य जर्मनीविरुद्ध मैदानात उतरताना इक्वाडोरचा निभाव लागणार नाही, असे मानले जात होते. मात्र, सर्व अंदाज धुडकावून लावत इक्वाडोरने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले आणि संस्मरणीय विजय साकारला.

टीकाकारांना चोख उत्तर, राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक

या अभूतपूर्व विजयानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत खेळाडूंचे आणि मुख्य प्रशिक्षक सेबॅस्टियन बेकासेसे यांचे विशेष आभार मानले. कठीण प्रसंगात आणि टीकेचा सामना करत संघाने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण देश अभिमानाने भारावून गेल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘‘टीका, अपमान आणि कठीण प्रसंगांचा सामना करूनही ज्या प्रकारे खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी कमबॅक केले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी संपूर्ण देशाला हा अथांग आनंद दिला आहे. उद्या देशभरात सुट्टी असेल! इक्वाडोर झिंदाबाद!’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT