पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 10 वेळा चॅम्पियन राहिलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच उपांत्य फेरीचा सामना अर्ध्यावरच सोडून मैदानाबाहेर गेला. त्याला सामन्याच्यामध्ये दुखापत झाल्याने त्याने सामना मध्येच माघार घेतली. पहिला सेट गमावल्यानंतर, तो पुढे जाण्यासाठी स्वतःला तंदुरुस्त वाटला नाही आणि निघून गेला. ही घटना धक्कादायक आहे कारण जोकोविचला स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट मानले जात होते. त्याच्या माघारीमुळे जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह अंतिम फेरीत पोहोचला आहे.
जोकोविचची दुखापत गंभीर असल्याचे मानले जात आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये झ्वेरेव्हविरुद्धच्या पहिल्या सेटमध्ये तो संघर्ष करताना दिसला. त्याने अनेक चुकीचे फटकेही मारले. टायब्रेकरमध्ये झ्वेरेव्हने पहिला सेट 7-6 असा जिंकण्यात यश मिळवले. यानंतर लगेचच, जोकोविचने बॅग उचलली आणि पंचांना कळवले की तो सामना पुढे चालू ठेवू शकत नाही. या स्पर्धेत जोकोविचचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे.
क्वार्टर फायनलमध्ये स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराजचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. यानंतर त्याला दोन दिवसांची विश्रांती मिळाली होती. जोकोविचला उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी ताजेतवाने वाटण्यासाठी 90 मिनिटांचा हीटिंग सेशन करायचा होता, परंतु त्याला सामना सोडावा लागला. सामन्यापूर्वी असे वृत्त आले होते की जोकोविच सामना खेळायचा की नाही याबद्दल गोंधळलेला होता. जोकोविचचे प्रशिक्षक अँडी मरे देखील बॅग घेऊन जाताना दिसले.