Paris Olympic 2024
आजपासून ऑलिम्पिकचे धूमशान. Pudhari Photo
स्पोर्ट्स

Paris 2024 Olympics | आजपासून ऑलिम्पिकचे धूमशान

सोनाली जाधव

पॅरिस, वृत्तसंस्था : क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहेत. यंदाचे ऑलिम्पिक अगदी उद्घाटन सोहळ्यापासूनच वेगळे ठरणार आहे. ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीना नदीवर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. (Paris 2024 Olympics)

त्याचप्रमाणे 18 दिवस चालणार्‍या या स्पर्धांत विविध विक्रम रचले जाणे, पदकांची लयलूट होणे, नवे तारे उदयास येणे आणि प्रस्थापितांकडून वर्चस्व सिद्ध केले जाणे अपेक्षित आहे. याच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांविषयी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (26 जुलै) होणार असला, तरी काही खेळांच्या स्पर्धांना बुधवारपासून (24 जुलै) सुरुवात झाली आहे. यात फुटबॉल, रग्बी सेव्हन्स, हँडबॉल आणि तिरंदाजी या खेळांचा समावेश आहे. भारतासाठी ऑलिम्पिकची सुरुवात तिरंदाजीपासून झाली आहे.

तिरंदाजीत भारताकडून पुरुषांमध्ये तरुणदीप राय, प्रवीण जाधव आणि धीरज बोम्मादेवरा, तर महिलांमध्ये दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि भजन कौर हे खेळाडू सहभाग नोंदवत आहेत. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय महिला संघाने आपली उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली आहे.

सीना नदीत भव्य उद्घाटन

सीना नदीच्या 3.7 मैल पात्रात ऑलिम्पिकचे उद्घाटन होईल. गारे देऑस्टरलिझ येथून उद्घाटन मिरवणुकीला सुरुवात होईल. नॉत्र दाम कॅथेड्रल, कन्सीर्गेरी पॅलेस अशा अनेक वास्तूंवरून ही मिरवणूक आयफेल टॉवरपाशी संपेल. फ्रान्स आणि जागतिक इतिहासातील 12 घटनांचे सादरीकरण उद्घाटन सोहळ्यात होणार आहे. ते नेमके कसे असेल, यावेळी गोपनीयता बाळगली जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ आणि पॅरिसच्या महापौर अ‍ॅनी हिगाल्डो यांनाही फार माहिती देण्यात आलेली नाही. थॉमस जॉली हे फ्रान्समधील रंगकर्मी सोहळ्याचे दिग्दर्शक आहेत. 10 हजार खेळाडूंची 90 बोटींमधून परेड होईल. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 11 वा.) सोहळ्यास सुरुवात होईल आणि तो साडेतीन तास चालणे अपेक्षित आहे. पॅरिस शहरात त्यावेळी सुरक्षेसाठी 50 हजार पोलिस सज्ज असतील. पंधराव्या लुईच्या कन्येच्या विवाहानंतर म्हणजे तब्बल 285 वर्षांनी सीना नदीमध्ये अशा प्रकारे ‘तरंगता’ समारंभ होत आहे.

Paris 2024 Olympics : रोख पारितोषिक दिले जाणार का?

ऑलिम्पिक स्पर्धा हौशी या परंपरेत मोडतात. येथे कधीही रोख पारितोषिक दिले जात नाही. मात्र, जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने आता वेगळी भूमिका घेण्याचे धाडस दाखवले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला रोख 50 हजार डॉलर पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. रिले शर्यतीसाठी 50 हजार डॉलरचे पारितोषिक चार जणांत वाटून देण्यात येईल. रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यास 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून सुरुवात होईल.

रशियाच्या खेळाडूंना प्रवेश मिळणार?

युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि त्यांना मदत करणार्‍या बेलारूसवर क्रीडाक्षेत्रात बंदी घालण्यात आली. ऑलिम्पिकमध्ये ही बंदी कायम असली, तरी रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना या स्पर्धांत खेळता येणार आहे. मात्र, ते आपल्या देशाच्या ध्वजाखाली न खेळता, वैयक्तिक तटस्थ खेळाडू (एआयएन) म्हणून खेळणार आहेत. तसेच ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात या खेळाडूंना सहभाग घेता येणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) स्पष्ट केले आहे.

‘ब्रेकिंग’चा समावेश तर बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटेला वगळले

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ एका नव्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. हा खेळ म्हणजे ‘ब्रेकिंग’. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स येथे 1970 च्या काळात हा नृत्यप्रकार

निर्माण झाला. मात्र, पुढे जाऊन त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अगदी अखेरच्या टप्प्यात ‘ब्रेकिंग’च्या स्पर्धा होणार आहेत. महिलांची स्पर्धा 9 ऑगस्ट, तर पुरुषांची स्पर्धा 10 ऑगस्टला होईल. दोन्ही विभागांत प्रत्येकी 16 स्पर्धकांचा सहभाग असेल. बेसबॉल/ सॉफ्टबॉल आणि कराटे या टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या गेलेल्या क्रीडा प्रकारांना यंदाच्या स्पर्धांतून वगळण्यात आले आहे. स्पोर्टस् क्लाइंबिंग खेळात अधिक पदके दिली जाणार आहे. कयाकिंगमधील ‘क्रॉस’ प्रकाराचे ऑलिम्पिक पदार्पण होणार आहे.

‘लिबर्टी हॅट’ मॅस्कॉट!

पॅरिस ऑलिम्पिकसाठी मॅस्कॉट अर्थात शुभंकर म्हणून ‘फिर्जियन हॅट’ची निवड करण्यात आली आहे. याला ‘लिबर्टी हॅट’ असेही संबोधले जात आहे. लाल रंगाच्या या हॅटला फ्रान्सच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून या हॅटकडे पाहिले जाते. त्यामुळे फ्रान्सच्या इतिहासाला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न ऑलिम्पिकच्या आयोजकांकडून करण्यात आला आहे.

सहा किमी लांब परेड भारताचा 84 वा क्रमांक

ऑलिम्पिक 2024 तब्बल 10 हजार खेळाडू सहभागी होणार असून त्यातील काही खेळाडू उद्घाटन समारंभाचा भाग असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू बोटीतून परेड करतील. ही परेड सहा किमी इतकी लांब असेल जी सेन नदीवर होईल. ही परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू होईल आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचेल. सुमारे 94 बोटी या परेडचा भाग असतील.

 उद्घाटन समारंभातील मार्चपास्टला सुरूवात लॉस एंजेलिसमधील 1908 च्या ऑलिम्पिकमध्ये झाला. उद्घाटन समारंभाच्या मार्चपास्टमध्ये ग्रीसचे खेळाडू कायम प्रथम असतात. ऑलिम्पिक खेळांना 1896 मध्ये अथेन्स, ग्रीस येथे सुरूवात झाली. हा देश ऑलिम्पिक खेळांचे जन्मस्थान मानला जातो. यासाठी ग्रीसचे खेळाडू आधी मार्चपास्ट करतात.

उद्घाटन समारंभासाठी यजमान देश मार्चपास्टच्या शेवटी असतो. यावेळी फ्रान्सचे खेळाडू मार्चपास्टमध्ये सर्वात शेवटी असतील. फ्रान्सच्या आधी पुढच्या ऑलिम्पिकचे म्हणजे 2028 चे यजमानपद मिळवलेला देश म्हणजे अमेरिका असेल.

 ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी इतर देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या (म्हणजे यंदा फ्रेंच भाषेच्या) अक्षरानुक्रमे ठरवला जातो. त्यामुळे  उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशन्समध्ये भारत 84व्या क्रमांकावर येईल.

रात्री 11 वाजता उद्घाटन सोहळा

ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्याचे आणि संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्टस 18 नेटवर्कवर दाखवण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT