स्पोर्ट्स

ध्रुव ज्युरेल करणार पदार्पण?

Arun Patil

राजकोट, वृत्तसंस्था : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव ज्युरेल तिसर्‍या कसोटी सामन्यात पदार्पण करू शकतो. ज्युरेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. दोन सामन्यांतील खराब कामगिरीमुळे के. एस. भरत याला वगळण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये के. एस. भरतला यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती, जिथे तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. अशा स्थितीत तिसर्‍या कसोटीत त्याला प्लेईंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट होऊ शकतो. 30 वर्षीय भरतच्या जागी यूपीचा नवोदित यष्टिरक्षक ज्युरेलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

'बीसीसीआय'च्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, के. एस. भरतची फलंदाजी अलीकडे खूपच खराब राहिली आहे. शिवाय, त्याची विकेटकिपिंगही चांगली नव्हती. त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता येत नाही. दुसरीकडे, ज्युरेल हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने उत्तर प्रदेश, भारत 'अ' आणि राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. ध्रुव ज्युरेलने राजकोटमध्ये कसोटी पदार्पण केल्यास आश्चर्य वाटायला नको. के. एस. भरतने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळालेली सुवर्णसंधी गमावली. त्याने चार डावांत 23 च्या सरासरीने केवळ 92 धावा केल्या.

ध्रुवची प्रथम श्रेणीत 46.47 सरासरी

ध्रुव ज्युरेलने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 46.47 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 249 धावा आहेत. 22 वर्षीय ज्युरेलने गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध 50 धावा केल्या होत्या आणि डिसेंबरमध्ये बेनोनी येथे दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात 69 धावा केल्या होत्या.

के. एल. राहुल अजूनही अनफिट?

भारतीय संघातील प्रमुख फलंदाज के. एल. राहुल राजकोट येथे 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यातून भारतीय संघातून बाहेर पडला आहे. निवड समितीने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कल या फलंदाजाची संघात निवड केली असल्याचे समजते आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही; पण रवींद्र जडेजाला मालिकेतील तिसर्‍या कसोटीसाठी मैदानात उतरण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. राहुलच्या उपलब्धतेवर निर्णय घेण्यासाठी आणखी एक आठवडा त्याचे निरीक्षण करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 'बीसीसीआय' आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा आहे की, राहुल चौथ्या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होईल. दरम्यान, कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचा संघात समावेश केला गेला असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT