पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२५ च्या रंगतदार पर्वात एक भन्नाट क्षण घडला! 11 वर्षांहून अधिक काळ चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळून, संघाला विजयाच्या शिखरावर नेणारा ड्वेन ब्राव्हो आता कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक बनला. याच पार्श्वभूमीवर कोलकाताचा संघ चेन्नईत दाखल झाला आहे. यावेळी ब्राव्होची भेट झाली थेट धोनीशी! यानंतर धोनीने त्याला "गद्दार!" म्हणून संबोधले. दोघांमधील मैत्रीचा एक मजेशीर क्षण चाहत्यांच्या मनात घर करून गेला! जाणून घेऊया याबद्दल...
चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो आणि धोनी यांच्यातील चेन्नईतील भेटीचा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ब्राव्होला पाहताच त्याला गद्दार म्हणत असल्याचे दिसून येते. ब्राव्हो सीएसकेच्या सराव क्षेत्रात येतो आणि जडेजाला मिठी मारतो. त्यानंतर तो नेटवर पोहोचतो, जिथे धोनी फलंदाजीचा सराव करत असतो. त्यानंतर दोघेही एकमेकांशी हस्तांदोलन करतात.
ड्वेन ब्राव्हो धोनीच्या खूप जवळचा आहे. दोघांमध्ये भावा-भावासारखे नाते आहे. दोघेही या नात्याला महत्त्व देतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा केकेआरने आयपीएल २०२५ मध्ये ब्राव्होला मार्गदर्शक बनण्यासाठी संपर्क साधला तेव्हा त्याने प्रथम धोनीला विचारले. हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्याने केकेआरची ऑफर स्वीकारली.
ड्वेन ब्राव्होने २०११ मध्ये सीएसकेसाठी पदार्पण केले. तेव्हापासून तो आयपीएल २०२२ पर्यंत खेळला. या ११ वर्षांत तो चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून उदयास आला. ब्राव्होने ११ वर्षांत सीएसकेसाठी खेळलेल्या १३० टी-२० सामन्यांच्या १२७ डावांमध्ये एकूण १५४ विकेट्स घेतल्या.