के. एल. राहुल 
स्पोर्ट्स

दिल्लीचा नॉनस्टॉप चौथा विजय

DC vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा होम ग्राऊंडवर सलग दुसरा पराभव

पुढारी वृत्तसेवा

बंगळूरु : के. एल. राहुलच्या क्लासिकल 93 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने नॉनस्टॉप चौथा विजय साजरा केला. होमग्राऊंड चिन्नास्वामीवरील ‘आरसीबी’ चाहत्यांची घोर निराशा झाली. त्यांचा संघ 6 विकेटस्नी पराभूत झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 150 धावा करतानाही संघर्ष करावा लागला. त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीने हे लक्ष्य 13 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. ‘आरसीबी’चा हा दुसरा पराभव असून, दिल्लीने चारपैकी चार सामने जिंकले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘आरसीबी’च्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली. फाफ ड्युप्लेसिस (2) याला यश दयालने बाद केले. पाठोपाठ भुवनेश्वर कुमारने जॅक फ्रेजर मॅकगर्क (7) आणि अभिषेक पोरेल (7) यांना तंबूत धाडले. 3 बाद 30 वरून के. एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला; पण सुयश शर्माने अक्षरला (15) बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर राहुलला साथ देण्यासाठी त्रिस्टन स्टब्ज आला. राहुल सेट होण्यापूर्वी त्याला एक जीवदान मिळाले. याचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. त्याने 37 चेंडूंत अर्धशतक झळकावले. 85 चेंडूंत संघाचे शतक फलकावर लागले. अर्धशतकानंतर राहुल चांगलाच पेटला, त्याने जोश हेझलवूडच्या षटकात 3 चौकार, एका षटकारासह 22 धावा घेतल्या. त्याचा जोश पाहून स्टब्जनेही आपले हात मोकळे सोडले. त्याने सुयश शर्माला चौकार आणि षटकार ठोकला.

शेवटच्या 3 षटकांत दिल्लीला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता असताना दोन एकेरी धावांनंतर के. एल. राहुलने चौकार आणि षटकार ठोकला. त्यात भरीस भर म्हणून दयालचा बाऊन्सर किपरच्या डोक्यावरून सीमापार जाताना 5 धावा देऊन गेला. यामुळे धावसंख्या बरोबरीत आली. के. एल. राहुलने फाईन लेगवर एक सुपरफाईन षटकार ठोकून दिल्लीला विजयी केले. राहुल 53 चेंडूंत 93, तर स्टब्ज 38 धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळूरकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी सलामीला फलंदाजी करताना डावाची सुरुवात केली. फिल सॉल्टने सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतला. त्याला विराट साथ देत होता. सॉल्टच्या आक्रमणामुळे पहिल्या 4 षटकांच्या आतच बंगळूरच्या 60 धावा पार झाल्या होत्या; पण चौथ्या षटकात मोठा गोंधळ झाला. धाव घेण्यासाठी पळत येणार्‍या सॉल्टला विराटने परत जाण्यास सांगितले आणि तो धावबाद झाला. सॉल्टने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 17 चेंडूंत 37 धावा करून बाद झाला.

त्यानंतर मात्र बंगळूरने नियमित अंतराने विकेटस् गमावण्यास सुरुवात केली. सहाव्या षटकात देवदत्त पडिक्कल एकाच धावेवर मुकेश कुमारविरुद्ध खेळताना बाद झाला, तर पुढच्या षटकात विराट कोहलीचा अडथळा विपराज निगमने मिचेल स्टार्कच्या हातून त्याला झेलबाद करत दूर केला. विराटने 14 चेंडूंत 22 धावा केल्या, ज्यात 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर लिव्हिंगस्टोनला 4 धावांवर 10 व्या षटकात मोहित शर्माने बाद केले. त्यापाठोपाठ 13 व्या षटकात जितेश शर्माही 3 धावांवर कुलदीप यादवविरुद्ध खेळताना के. एल. राहुलकडे झेल देत बाद झाला. 15 व्या षटकात फॉर्ममध्ये असलेल्या रजत पाटीदारला कुलदीप यादवनेच बाद करत बंगळूरला मोठा धक्का दिला. रजतने 23 चेंडूंत 25 धावा केल्या. विपराज निगमने 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कृणाल पंड्याला 18 धावांवर बाद केले. तरी शेवटी टीम डेव्हिडने केलेल्या आक्रमणामुळे बंगळूरने 150 धावांचा टप्पा पार केला. बंगळूरने 20 षटकांत 7 बाद 163 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजी करताना विपराज निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. मुकेश कुमार आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेटस् घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : 20 षटकांत 7 बाद 163 धावा. (फिल सॉल्ट 37, रजत पाटीदार 25. कुलदीप यादव 2/17, विपराज निगम 2/18)

दिल्ली कॅपिटल्स : 17.5 षटकांत 4 बाद 169 धावा. (के. एल. राहुल नाबाद 93, त्रिस्टन स्टब्ज नाबाद 38. भुवनेश्वर 2/26)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT