लखनौ; वृत्तसंस्था : ज्या मैदानात लखनौ सुपर जायंटस्चे मालक संजीव गोयंका यांच्याकडून अपमानास्पद बोलणे ऐकावे लागले, त्याच स्टेडियममध्ये के. एल. राहुलने लखनौ सुपर जायंटस्ला चांगलाच इंगा दाखवला. मंगळवारी (दि.22) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एलएसजीला 8 विकेटस्नी हरवले. दिल्लीकडून आधी मुकेश कुमारने 4 विकेटस् घेत विजयाचा पाया रचला तर नंतर अभिषेक पोरेल (51) आणि के. एल. राहुल (57*) यांनी त्यावर विजयाचा कळस चढवला. या विजयाने दिल्लीचे 12 गुण झाले असून त्यांनी आता प्ले ऑफकडे आगेकूच केली आहे.
या सामन्यात दिल्लीसमोर लखनौने विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने 17.5 षटकांतच 2 विकेटस् गमावत 161 धावा करून पूर्ण केला. के. एल. राहुलने विजयी षटकार मारला.
दिल्लीकडून सलामीला अभिषेक पोरेल आणि करुण नायर उतरले होते. त्यांनी सुरुवातही चांगली केली. जवळपास 10 च्या धावगतीने ते खेळत होते, पण चौथ्या षटकात नायरचा मोठा अडथळा एडन मार्करामने दूर केला. त्याने नायरला 9 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकारासह 15 धावांवर असताना त्रिपळाचीत केले. त्यानंतर पोरेलला के. एल. राहुलने चांगली साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण करत संघाला 105 धावांचा टप्पा पार करून दिला होता. त्यामुळे दिल्लीसाठी विजय सोपा झाला होता. अभिषेकने अर्धशतकही पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर त्याला 12 व्या षटकात मार्करामनेच बाद केले, त्याचा झेल डेव्हिड मिलरने घेतला. पोरेलने 36 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारासह 51 धावा केल्या.
तो बाद झाल्यानंतरही कर्णधार अक्षर पटेलने के. एल. राहुलला चांगली साथ दिली. अक्षरने आक्रमक खेळण्यावर भर दिला. त्यांच्यातही नाबाद अर्धशतकी भागीदारी झाली. यादरम्यान, के. एल. राहुलने आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. त्याने यासह आयपीएलमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला. के. एल. राहुलनेच 18 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर प्रिन्स यादवविरुद्ध षटकार खेचत दिल्लीचा विजय निश्चित केला. के. एल. राहुलने 42 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या. अक्षर पटेलने 20 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले.
तत्पूर्वी, लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या. लखनौकडून एडन मार्करामने 33 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 36 चेंडूंत 45 धावा केल्या. आयुष बदोनीने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणाला खास काही करता आले नाही. दिल्लीकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेटस् घेतल्या. मिचेल स्टार्क आणि दुश्मंता चमिरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.