नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आत्मविश्वास दुणावलेला ऋषभ पंत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. त्यामुळे गेल्या वेळी उपविजेता राहिलेल्या दिल्लीला जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी ही पंतच्या खांद्यावर असेल. संयुक्त अरब अमिरात येथील फायनलमध्ये पराभूत झालेल्या दिल्ली संघाची मजबूत फलंदाजी आणि चांगला जलदगती मारा यामुळे ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पंतला श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने कर्णधार बनविण्यात आले. दिल्ली 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतील सर्वात संतुलित संघांपैकी एक आहे. त्यांच्याकडे गोलंदाज आणि फलंदाज यांचा योग्य ताळमेळ आहे. वरच्या फळीत शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज आहेत. यासोबत पंत, मार्कस स्टोईनिस, शिमरोन हेटमायर आणि सॅम बिलिंग्जसारखे खेळाडूदेखील आहेत. धवनने (618 धावा) गेल्या सत्रात सर्वाधिक धावा केल्या होत्या व तो सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानी होता. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 98 आणि 67 धावा केल्या होत्या.
तर, शॉने विजय हजारे स्पर्धेत 827 धावा केल्या. पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत निर्णायक कामगिरी करत आपली छाप पाडली. गोलंदाजीत कॅगिसो राबाडाने गेल्या सत्रात 'पर्पल कॅप' मिळवली होती. यासोबत संघाकडे एन्रिच नॉर्त्जे, ख्रिस वोक्स, इशांत शर्मा आणि उमेश यादवसारखे गोलंदाज आहेत. दिल्लीची एक बाजू अशी आहे की, त्यांच्या आघाडीच्या खेळाडूंना त्याच्या तोडीचा पर्याय नाही. त्यामुळे त्यांना एन्रिच नॉर्त्जे व कॅगिसो रबाडा यांना आराम देता आलेला नाही. पंतला दुखापत झाली तरीही त्यांच्याकडे पर्याय नाही.
पंतला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. यासोबतच टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची संधीदेखील त्याच्याकडे आहे. तसेच धवन सलामी फलंदाज म्हणून आपली जागा नक्की करण्याचा प्रयत्न करेल. पंतने कर्णधारपदाचा दबावदेखील घेता कामा नये. कारण, त्याचा परिणाम फलंदाजीवर होऊ शकतो. यासोबतच दिल्लीला राबाडा आणि नॉर्त्जेचा पर्याय शोधणे गरजेचे आहे. गेल्या वेळी नऊ पैकी सात सामने जिंकल्यानंतर संघ सलग चार सामन्यांत पराभूत झाला होता. त्यामुळे संघाला यावेळी ही चूक सुधारण्याची गरज आहे.
दिल्लीचा संघ पुढीलप्रमाणे :
शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो राबाडा, एन्रिच नॉर्त्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टिव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकसान मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्ज.