धर्मशाळा; वृत्तसंस्था : अक्षर पटेल (56), डेव्हिड मिलर (51) यांची तडफदार अर्धशतके आणि स्टार्क-माधव तिवारी यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत पंजाब किंग्जला 3 गडी राखून निसटती मात दिली. प्रारंभी, श्रेयस अय्यर (नाबाद 59) व प्रियांश आर्य (56) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या बळावर पंजाबने 20 षटकांत 5 बाद 210 धावांचा डोंगर रचला होता. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीने त्याहीपेक्षा धमाकेदार खेळ साकारत 19 षटकांत 7 बाद 216 धावांसह विजय खेचून आणला.
विजयासाठी 211 धावांचे आव्हान असताना के. एल. राहुल (9), अभिषेक पोरेल (5), साहिल पारीख (13), स्टब्ज (12) स्वस्तात बाद झाल्याने दिल्लीची एकवेळ 8.2 षटकांत 4 बाद 74 अशी स्थिती होती. मात्र, कर्णधार अक्षर पटेलने (30 चेंडूंत 56) व डेव्हिड मिलरने (28 चेंडूंत 51) यांनी पाचव्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयाच्या ट्रॅकवर आणले. शेवटच्या टप्प्यात आशुतोष शर्मा (10 चेंडूंत 24) बाद झाल्यानंतर माधव तिवारी (8 चेंडूंत नाबाद 18) व अकिब नबी (2 चेंडूंत नाबाद 10) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या विजयासह दिल्लीने 10 गुणांसह प्ले ऑफसाठी आशाअपेक्षा कायम ठेवल्या.
प्रारंभी, पंजाब किंग्जने 5 बाद 210 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर प्रियांश आर्यच्या झंझावाती अर्धशतकानंतर दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सामन्यावर पकड मिळवली. आर्यने अनुभवी मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात 22 धावा कुटत पंजाबला आक्रमक सुरुवात करून दिली. प्रियांशने केवळ 33 चेंडूंत 56 धावांची खेळी केली. यात अर्धा डझन षटकारांचा समावेश होता. त्याने स्टार्कसोबतच लुंगी एन्गिडी आणि मुकेश कुमारचाही समाचार घेतला.
कर्णधार श्रेयस अय्यर (36 चेंडूंत नाबाद 59) आणि कूपर कॉनोली (27 चेंडूंत 38) यांनी तिसर्या विकेटसाठी 83 धावा जोडल्या. मात्र, त्यांना धावगती वाढवण्यात फारसे यश आले नाही. 19व्या षटकात मिचेल स्टार्कने मार्कस स्टॉईनिस आणि शशांक सिंगला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडले. अखेरच्या षटकात लुंगी एन्गिडीने पंजाबला रोखून धरले.
सामन्यात एकत्रित 426 धावांची आतषबाजी
धर्मशाळेतील फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर दोन्ही संघांनी एकत्रित 426 धावांची आतषबाजी केली. पंजाबच्या डावात 15 चौकार व 13 षटकार, तर दिल्लीच्या डावात तब्बल 21 चौकार व 11 षटकारांचा समावेश राहिला.