पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सने 2025 इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामासाठी आपला कर्णधार निवडला आहे. अष्टपैलू आणि संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अक्षर पटेल याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. 31 वर्षीय अक्षर पटेल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला होता. अक्षरची कर्णधार पदावर नियुक्ती केल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत दिली.
मागील सहा हंगामात त्याने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कॅपिटल्ससाठी 82 सामने खेळताना त्याने 967 धावा केल्या असून 62 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, त्याने 7.09 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीने गोलंदाजी केली. मैदानावरील चपळ खेळाडू असण्यासोबतच, त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि भारतीय संघाच्या चाहत्यांशी विशेष नाते निर्माण केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या या निर्णयामुळे आगामी हंगामासाठी संघाची रणनीती कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली.