स्पोर्ट्स

Virat Kohli चे १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत झंझावाती कमबॅक! ऐतिहासिक शतकासह मोडला सचिनचा ‘हा’ खास विक्रम

Virat Kohli century : दिल्लीकडून खेळताना विराटने आंध्र प्रदेशविरुद्ध विंटेज स्टाईलमध्ये शानदार शतक झळकावले

रणजित गायकवाड

बेंगळुरू : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' विराट कोहलीने तब्बल १५ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आणि आपल्या बॅटने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला 'किंग' का म्हणतात. विजय हजारे ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना विराटने आंध्र प्रदेशविरुद्ध विंटेज स्टाईलमध्ये शानदार शतक झळकावले. या खेळीसह विराटने क्रिकेटच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालत महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.

कोहलीचा धमाका

आंध्र प्रदेशने विजयासाठी दिलेल्या २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात सावध झाली. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने मैदानात येताच खेळाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने अवघ्या १०१ चेंडूत १३१ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये १४ नेत्रदीपक चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, विराटच्या या खेळीत त्याचा ट्रेडमार्क 'कव्हर ड्राईव्ह' आणि विकेट्समधील चित्त्यासारखी धाव लक्षवेधी ठरली. त्याने ३७ धावा फक्त एकेरी धावांमधून काढल्या, तर ८ धावा दुहेरी धावांमधून वसूल केल्या.

१६,००० धावांचा टप्पा पार; सचिननंतरचा केवळ दुसरा भारतीय

या शतकी खेळीदरम्यान विराटने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (एकदिवसीय आणि देशांतर्गत ५० ओव्हर्स क्रिकेट) १६,००० धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो जगातील ९ वा आणि सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

लिस्ट-ए क्रिकेटमधील टॉप भारतीय फलंदाज

  • सचिन तेंडुलकर : २१,९९९ धावा : ५३८ डाव

  • विराट कोहली : १६,०००+ धावा : ३३० डाव

  • सौरव गांगुली : १५,६२२ धावा : ४२१ डाव

  • रोहित शर्मा : १३,७५८ धावा : ३३८ डाव

विराटची सरासरी ५० पेक्षा जास्त असून, १६,००० धावांच्या क्लबमध्ये असलेल्या सर्व दिग्गज फलंदाजांमध्ये (पाँटिंग, संगकारा, रिचर्ड्स इ.) विराटची सरासरी सर्वोत्तम आहे.

पंतकडून 'हाय-फाय' आणि मैदानावर जल्लोष

विराट १३१ धावा करून बाद होऊन जेव्हा पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा मैदानात उतरणारा नवा फलंदाज आणि भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने विराटला 'हाय-फाय' देत त्याच्या खेळीचे कौतुक केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लाईव्ह टेलिकास्ट नसल्याने चाहत्यांची नाराजी

एकीकडे विराट कोहलीचे शतक आणि दुसरीकडे मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध ठोकलेले तुफानी शतक, यामुळे देशांतर्गत क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध नसल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला. विराट-रोहितसारखे दिग्गज खेळत असताना चाहत्यांना केवळ स्कोअरकार्डवर समाधान मानावे लागले आहे.

२०२७ विश्वचषकाची नांदी?

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत दोन शतके झळकावली होती. आता देशांतर्गत क्रिकेटमधील या फॉर्ममुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी विराटने आपली तयारी आत्तापासूनच सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT